आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

उत्साहात साधना कन्या प्रशालेचा प्रवेशोत्सव

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 15, 2026
Spread the love

बार्शी : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त शे. मु. व जवारमल साधना कन्या प्रशाला, बार्शी येथे सोमवार, दि. १५ जून रोजी प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींच्या स्वागतासाठी शाळा परिसर आकर्षक सजावटीने सजविण्यात आला होता. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींमध्ये आनंद, उत्साह आणि नवचैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापिका श्रीमती विनिता काळे, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींचे औक्षण करून त्यांच्या हातात रंगीबेरंगी फुगे देत त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. स्वागताच्या या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थिनींनी उत्साहात सेल्फी काढत नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत केले आणि आनंदाने आपल्या वर्गात प्रवेश केला.

यावेळी प्रशालेत नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचेही स्वागत करण्यात आले. उपस्थितांनी त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती विनिता काळे यांनी विद्यार्थिनींना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत नियमित उपस्थिती, शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण, अभ्यासातील सातत्य आणि सर्वांगीण विकास याबाबत मार्गदर्शन केले. शिक्षणासोबतच सांस्कृतिक, क्रीडा व विविध सहशालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान शासनाच्या वतीने इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नवीन पाठ्यपुस्तके मिळाल्याने विद्यार्थिनींमध्ये विशेष उत्साह दिसून आला. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी . जयश्री गाढवे , व्ही. बी. वाघमारे, दिपक दुधनकर, एम. पी. पाटील मॅडम, तानाजी ढाळे , श्रीमती व्ही. नांदवटे, विनायक माने (कनिष्ठ लिपिक), विभिषण नलगे, नागनाथ सावंत व गणेश सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. विद्यार्थिनी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरली. प्रवेशोत्सवातील स्वागत सोहळा, विद्यार्थिनींचा उत्साह आणि पाठ्यपुस्तक वितरणाची क्षणचित्रे उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरली.