आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

व्यावसायिकाची ५ कोटी २१ लाखांची फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 15, 2026
Spread the love

पुणे : चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाला एका कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. संबंधित व्यावसायिक गेली सात वर्षे त्या कंपनीत गुंतवणूक करत होते. लवकरच मोठी रक्कम मिळणार असल्याचे त्यांनी पत्नीला सांगितले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यानंतरही सायबर चोरटे त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून गुंतवणूक करण्यास सांगत होते. त्यातून हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. सायबर चोरट्यांनी या व्यावसायिकाची तब्बल ५ कोटी २१ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

याबाबत मंगलवाडी येथील ७५ वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एनजीपीआय कंपनीतर्फे अवतारसिंग, रेड्डी, देसाई, वेणुगोपाल, संजीव शर्मा तसेच एफ.आर. सर्व्हिसेसतर्फे रेना शर्मा, अजय कुमार, चंद्र प्रकाश, सुशील (रा. अंबरनाथ, ठाणे) व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१८ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींच्या पतींचा लंगार विडीचा व्यवसाय होता. त्यांचे ऑक्टोबर २०२५ मध्ये कर्करोगाने निधन झाले. त्यांनी १ ऑक्टोबर २०२५ रोजी रुग्णालयात उपचार सुरू असताना आपण २०१८ पासून एनजीपीआय कंपनीमध्ये पैसे गुंतवत असल्याचे पत्नीला सांगितले होते. रुग्णालयात दाखल असतानाही ते वारंवार फोनवर बोलत असत. तसेच त्यांनी त्या काळात या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी फिर्यादींकडे ५० हजार रुपये मागितले होते.

व्यवसायातील बाबींमध्ये हस्तक्षेप न केल्याने फिर्यादींनी त्याबाबत अधिक चौकशी केली नव्हती. मात्र, १४ जुलै २०२५ रोजी त्यांच्या पतीच्या मोबाईलमध्ये ‘१७ कोटी ८४ लाख १२ हजार रुपये देणे आहे’ असा संदेश देसाई नावाच्या महिलेने पाठविलेला आढळला. त्यानंतर तपासणी केली असता, त्यांच्या पतीने २०१८ ते २०२५ या कालावधीत तब्बल १६७ वेळा पैसे पाठविल्याचे समोर आले. त्यातून त्यांची ५ कोटी २१ लाख ३७ हजार १७१ रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक उत्कर्षा देशमुख करीत आहेत.

तब्बल सात वर्षे सुरू होती फसवणूक
व्यावसायिक रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी पत्नीला, “थोड्याच दिवसांत मला माझी गुंतवलेली रक्कम नफ्यासह परत मिळणार आहे,” असे सांगितले होते. मात्र, आजारपणामुळे उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यानंतरही त्यांच्या मोबाईलवर संबंधित कंपनीकडून गुंतवणुकीसाठी फोन येत होते. फोन करणारे व्यक्ती फिर्यादींना त्यांच्या पतींशी बोलण्याची विनंती करत होते. मात्र, त्यांच्या निधनाची माहिती न देता फिर्यादी “ते सध्या बोलू शकत नाहीत,” असे सांगत होत्या. कारण पतींनी नेमकी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली होती, याची माहिती त्यांना मिळवायची होती. यानंतर त्यांच्या मुलीने ऑनलाइन एनजीपीआय कंपनीची माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या कंपनीविषयी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. त्यावरून संबंधित कंपनी अस्तित्वात नसल्याचा संशय बळावला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.