आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना सुचवा : जिल्हाधिकारी डुडी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 16, 2026
Spread the love

पुणे : जिल्ह्यातील रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी अपघातप्रवण (ब्लॅकस्पॉट) ठिकाणांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. सर्व संबंधित विभागांनी स्थळ पाहणीदरम्यान सूक्ष्म निरीक्षणे नोंदवून अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना सुचवाव्यात. याबाबत लवकरच आढावा बैठक घेऊन कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातील, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त संदीप भाजीभाकरे, पिंपरी-चिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, पुण्याचे सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, पिंपरी-चिंचवडचे राहुल जाधव, बारामतीचे सुरेंद्र निकम, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जितेंद्र डुडी म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे अपघातांमुळे होणारे मृत्यू रोखण्यास प्राधान्य देण्यात यावे.

पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी संयुक्त स्थळ पाहणी करावी. ब्लॅकस्पॉटची संयुक्त पाहणी करून अपघातांची कारणे व आवश्यक उपाययोजनांबाबतचा अहवाल २९ जून २०२६ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.

अपघात रोखण्यासाठी स्थळ पाहणी अहवालात सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांनुसार सर्व संबंधित विभागांनी गांभीर्याने कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.

यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, याची सर्व संबंधित विभागांनी नोंद घ्यावी. वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.

नवले ब्रिज परिसरातील अपघात कमी करण्यासाठी यापूर्वी सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांनुसार भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कार्यवाही करावी. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

संदीप गिल म्हणाले, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अपघात कमी करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाका परिसरात अपघात टाळण्यासाठी मोठ्या आकाराचे जनजागृती फलक लावावेत.

जिल्हा पोलीस ग्रामीण दलाकडून अपघातप्रवण स्थळांची यादी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने या यादीतील स्थळांची पाहणी करण्यासाठी लवकरच दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल.

वाहतूक कोंडीमागे नियमांचे उल्लंघन हे एक प्रमुख कारण असून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे, असेही संदीप गिल म्हणाले.

या बैठकीत परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन तसेच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी अपघात कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.