रविनंदा लँडमार्क्सच्या समीर जैन यांच्यावर गुन्हा दाखल
केसनंदमध्ये १५० जणांकडून फ्लॅटसाठी पैसे घेऊन ५० कोटींची फसवणूक : आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : केसनंद येथे गृहप्रकल्प जाहीर करून २०१८ पासून तब्बल १५० जणांकडून बुकिंग घेऊन त्यांना फ्लॅट न देता सुमारे ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रविनंदा लँडमार्क्सच्या संचालकावर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.
समीर रवींद्र जैन (रा. अरिहंत हौसिंग सोसायटी, मार्केटयार्ड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत असोसिएशन ऑफ पर्सन्स रविनंदा टॉवर्सचे चेअरमन सुखजित सिंग निर्मल सिंग सैनी (रा. शुक्रवार पेठ) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर जैन हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे मुख्य कार्यालय मार्केटयार्ड येथे आहे. त्यांनी केसनंद येथील शेतकरी व जमीनमालकांबरोबर २९ जुलै २०१५ रोजी जॉइंट व्हेंचर करार केला होता.
जमीनमालक आणि बांधकाम व्यावसायिक समीर जैन यांच्यात ४० व ६० टक्के अशी भागीदारी निश्चित करण्यात आली होती. या करारानुसार समीर जैन यांनी जिल्हाधिकारी तसेच पीएमआरडीएकडून आवश्यक परवानग्या घेतल्या.
रविनंदा लँडमार्क्स युनिट-५ अंतर्गत व्यापारी व निवासी प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी प्रकल्पासाठी नोंदणी सुरू केली. सुमारे १५० जणांनी या प्रकल्पात फ्लॅट खरेदीसाठी नोंदणी करून त्यासाठी पैसे भरले.
प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. या प्रकल्पात ए, बी, सी आणि डी असे टॉवर्स उभारण्यात येणार होते. बांधकामाला सुरुवात झाली; मात्र कोविड महामारीमुळे काम बंद पडले.
या कालावधीत टॉवर्सचे सात मजल्यांपर्यंतचे स्लॅब आणि सांगाडा उभारण्यात आला होता. त्यानंतर मात्र बांधकाम पुढे सरकले नाही. फ्लॅट बुकिंग केलेल्या नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करूनही बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही.
अखेर फ्लॅटधारकांनी असोसिएशनची स्थापना करून प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू केला. तरीही समीर जैन यांनी त्यांना कोणतीही दाद दिली नाही. अखेर असोसिएशनने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली.
रविनंदा लँडमार्क्स प्रकल्पातील सुमारे १५० फ्लॅटधारकांकडून अंदाजे ५० कोटी रुपये घेऊन त्यांना फ्लॅट न देता फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन खांदारे करीत आहेत.
