आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कुलवंत वाणी समाज ट्रस्टकडून गुणवंत विद्यार्थिनी समृद्धी वाळकेचा सत्कार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 16, 2026
Spread the love

भूम : कुलवंत वाणी समाज ट्रस्ट व सर्व समन्वयकांच्या वतीने समाजातील दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा दरवर्षी त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्याची परंपरा जपली जात आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शैक्षणिक क्षेत्रात अधिक प्रगती करण्यासाठी प्रेरणा दिली जाते.

यावर्षी भूम येथील विद्यार्थिनी समृद्धी रंगनाथ वाळके हिने दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करत राणीतारा राजे कन्या प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिने दहावी परीक्षेत ९०.३४ टक्के गुण मिळवून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या निवासस्थानी भेट देऊन ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करून गौरव केला.
यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी व समाजबांधव संजय होळकर, धनंजय शेटे, दीपक चौधरी, अमित होळकर, विकास माळवदे, गणपत वाळके आणि रंगनाथ वाळके उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी समृद्धीचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कुलवंत वाणी समाज ट्रस्टतर्फे केवळ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांचीही काळजी घेतली जाते. ट्रस्टच्या दत्तक विद्यार्थी योजनेअंतर्गत दरवर्षी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाते. यावर्षीही शहरातील १३ विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
समाजातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, गुणवंतांचा सन्मान करणे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठबळ देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असून, ट्रस्टच्या या कार्याचे समाजातून कौतुक होत आहे.