आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

डोक्यात दगड घालून कुत्र्याला जीवे मारले

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 16, 2026
Spread the love

पुणे : कुत्र्याला बॅटने मारल्याने त्याने एका तरुणाला चावा घेतला. त्यानंतर कुत्रा चावल्याच्या रागातून त्या तरुणाने कुत्र्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारले. खडकी पोलिसांनी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जीवन भीमसेन सोनवणे (वय ५२, रा. वसुधा इक्विनॉक्स शेजारी, तेली चाळ, बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आलम शेख (वय २७, रा. तेली चाळ, बोपोडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १५ जून रोजी पहाटे सव्वाचारच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जीवन सोनवणे यांचा मित्र पियूष बनकर यांच्या सोसायटीमध्ये कुत्रा पाळण्यास मनाई आहे. त्यामुळे त्याने त्याच्याकडे असलेला ‘ऑगी’ हा पॉमेरेनियन जातीचा कुत्रा सोनवणे यांच्याकडे दिला होता. ऑगी हा सोनवणे यांच्या घराबाहेरच राहत असे.

सोसायटीमध्ये क्रिकेट खेळत असताना आलम शेख याने ऑगीला बॅटने मारले होते. त्यामुळे एका दिवशी ऑगीने आलमला चावा घेतला होता. १५ जून रोजी रात्री १ वाजेपर्यंत ऑगी हा कुत्रा सोनवणे यांच्यासोबत होता. त्यानंतर ते घरी झोपलेले असताना त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या शीतल नाटेकर यांनी फोन करून सांगितले की, तुमचा कुत्रा घरासमोर जखमी अवस्थेत पडलेला आहे.

सोनवणे यांनी बाहेर येऊन पाहिले असता ऑगी गंभीर जखमी अवस्थेत दिसला. त्याच्या उजव्या कानाखाली जमिनीवर रक्त साचलेले होते. त्याला अपघात झाला असावा, असे समजून त्यांनी त्याचा अंत्यसंस्कार केला.

त्यानंतर त्यांच्या सोसायटीच्या शेजारी असलेल्या वसुधा इक्विनॉक्स कार्यालयात जाऊन ऑगीला नेमके काय झाले, हे सीसीटीव्ही फुटेजमधून पाहण्याचा निर्णय घेतला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोपी हेअर ड्रेसर या दुकानाचा मालक आलम शेख हा हातात दगड घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आलम शेख याची चौकशी केली असता, “ऑगी मला चावला होता, त्यामुळे मी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला मारले,” अशी कबुली त्याने दिली.

या प्रकरणी आलम शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गाडेकर पुढील तपास करीत आहेत.