आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाला लुटले

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 16, 2026
Spread the love

पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करून त्यांना लुटल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी परिसरात घडली. ज्येष्ठ नागरिकाकडील सोन्याच्या अंगठ्या आणि सोनसाखळी असा सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

याबाबत एका ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मांजरी परिसरात राहतात. ते १४ जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शेवाळवाडी परिसरातून शेताकडे निघाले होते. पुरातन महादेव मंदिराजवळ एका व्यक्तीने स्वतःला पोलीस असल्याचे सांगत त्यांच्याशी संवाद साधला. त्याने बनावट ओळखपत्रही दाखविले.

“या भागात चोरी करून एक चोरटा आला आहे, तुम्ही त्याला ओळखता का?” असे विचारत त्याने तेथे बसलेल्या एका व्यक्तीकडे बोट दाखविले. ज्येष्ठ नागरिकांनी त्याला ओळखत नसल्याचे सांगितल्यानंतर, “या भागात ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तुमच्याकडील दागिने काढून ठेवा,” अशी बतावणी केली.

तेथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या व्यक्तीनेही आपल्या अंगावरील दागिने काढून रुमालात बांधल्याचे नाटक केले. त्यानंतर स्वतःला पोलीस म्हणवून घेणाऱ्या चोरट्याने तो रुमाल त्याच्या पिशवीत ठेवला. त्याचप्रमाणे फिर्यादी ज्येष्ठ नागरिकांनीही आपल्या अंगावरील सोन्याच्या दोन अंगठ्या व सोनसाखळी असा सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज रुमालात बांधला. मात्र, तो रुमाल घेऊन दोन्ही चोरटे तेथून पसार झाले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे करीत आहेत.