बार्शी पोलिसांची तत्परता : हरवलेली चिमुकली पालकांच्या ताब्यात
टिळक चौकात सुखरूप आढळली ४ वर्षीय रुद्राक्षा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : शहरातील मांगडे चाळ परिसरातील रुद्राक्षा बाबासाहेब मांगडे (वय ४ वर्षे) ही चिमुकली आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घरातील कोणालाही न सांगता घराबाहेर पडली होती. मुलगी दिसून न आल्याने तिचे वडील बाबासाहेब दगड्डू मांगडे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलीचा शोध घेण्याची विनंती केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बार्शी शहर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. परिसरात शोध घेत असताना सदर मुलगी टिळक चौक, बार्शी येथे सुखरूप अवस्थेत आढळून आली. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणून तिच्या आई-वडिलांच्या उपस्थितीत विचारपूस करण्यात आली. यावेळी तिने खेळणे घेण्यासाठी घरातून बाहेर पडल्याचे सांगितले.
मुलगी सुरक्षित असल्याची खात्री करून तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले. मुलगी सुखरूप मिळाल्याने तिच्या पालकांनी बार्शी शहर पोलिसांचे आभार मानले.
ही कामगिरी बार्शी शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संगप्पा मुळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल बोंदर आणि पोलीस कॉन्स्टेबल संतोष जाधवर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
बार्शी शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेली चिमुकली अल्पावधीतच शोधून काढण्यात यश आले.
