रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी
पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग : कर्वे रोडवरील मृत्युंजय मंदिराजवळील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दारूच्या नशेत रिक्षाचालकांना मारहाण करून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका गुंडाविरोधात रिक्षाचालकाने पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्याने संबंधित गुंडाचे चांगलेच फावले. त्याने तक्रार दिल्याचा राग मनात धरून रिक्षाचालकाला अडवून त्याच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना कर्वे रोडवरील मृत्युंजय मंदिराजवळील महाराष्ट्र बँक चौकात घडली.
याबाबत कृष्णा रामचंद्र ढगे (वय ३१, रा. रामनगर, वारजे माळवाडी) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुभम गोफणे (रा. खडकवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा ढगे हे रिक्षाचालक असून शुभम गोफणे हा मृत्युंजय मंदिराजवळील रिक्षा स्टँड परिसरात वारंवार दारूच्या नशेत येऊन रिक्षाचालकांना त्रास देत होता.
यापूर्वीही त्याने कृष्णा ढगे यांना मारहाण केली होती. याबाबत ढगे यांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती.
दरम्यान, १५ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कृष्णा ढगे हे त्यांच्या मित्रांसह घरी जात असताना शुभम गोफणे याने त्यांना अडवले.
पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून त्याने ढगे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर रस्त्यावरील दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात ढगे गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर त्यांच्या मित्रांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याला तीन टाके घालून प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष कदम करीत आहेत.
