आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन मुलाकडून ६ मोटारसायकली जप्त

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 17, 2026
Spread the love

पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन वारजे माळवाडी पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या ६ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे तपास पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना वारजे येथील गणपती माथा परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीजवळ एक मुलगा संशयास्पदरीत्या थांबलेला आढळला.

पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांनी त्याच्याकडे दुचाकीबाबत चौकशी केली असता तो सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता, सदर दुचाकी वारजे येथील सह्याद्री शाळेसमोरून चोरी केल्याची त्याने कबुली दिली. पुढील चौकशीत त्याने आणखी काही दुचाकी वाहने चोरी केल्याचेही सांगितले.

पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ६ दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील २ आणि अलंकार पोलीस ठाण्यातील १ असे एकूण ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.

मौजमजेसाठी आपण ही वाहने चोरी करत असल्याची कबुली संबंधित अल्पवयीन मुलाने दिली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी आणि पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार अमित शेलार, बालाजी काटे, योगेश वाघ, शरद पोळ, सागर कुंभार, अमित जाधव, सत्यजित लोंढे, गणेश शिंदे, महादेव शिंदे, अमोल सुतकर आणि निखील तांगडे यांनी केली.