आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सराईत गुन्हेगाराकडून ३ पिस्टल व ५ काडतुसे गुन्हे जप्त

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 17, 2026
Spread the love

पुणे : वडगाव येथील आंबेगाव पठार परिसरात थांबलेल्या दोघांकडून गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने ३ पिस्टल आणि ५ जिवंत काडतुसे असा १ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्रथमेश पंकज देसाई (वय २१, रा. जाधव बिल्डिंग, नर्‍हे, आंबेगाव) आणि अनिकेत आनंद केंद्रे (वय ३६, रा. सिंहगड रोड, वडगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रथमेश देसाई याच्याविरुद्ध पर्वती आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखेच्या युनिट २ मधील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी तसेच पोलीस अंमलदार १६ जून रोजी गुन्हे प्रतिबंधक गस्त आणि पेट्रोलिंग करीत होते.

त्यावेळी पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे आणि उज्वल मोकाशी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वडगाव पठार येथे दोन संशयित व्यक्ती थांबल्या असून त्यांच्याकडे हत्यारे आहेत.

यानंतर युनिट २ च्या पथकाने सिंहगड-आंबेगाव पठार परिसरात छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. प्रथमेश देसाई याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली.

तर अनिकेत केंद्रे याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली. दोघांकडे अधिक चौकशी केली असता, मध्य प्रदेशातील उमरटी येथील पप्पीसिंग याच्याकडून ७५ हजार रुपयांना तीन पिस्टल आणि पाच काडतुसे स्वसंरक्षणासाठी खरेदी केल्याची माहिती त्यांनी दिली.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, नागनाथ राख, सजेर्राव सरगर, संतोष टकले, विजयकुमार पवार, ओमकार कुंभार, शंकर कुंभार, सद्दाम तांबोळी, अजिम शेख, विनोद चव्हाण, योगेश मांढरे, संजय आबनावे, विशाल दळवी, संदीप शिर्के, ऋषिकेश व्यवहारे, साधना ताम्हाणे आणि विद्या शिंदे यांनी केली.