तब्बल १५ गुन्ह्यांतील वाँटेड सराईत गुन्हेगार जेरबंद
खंडणीविरोधी पथकाची कामगिरी : वर्षभरापासून देत होता पोलिसांना गुंगारा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दरोडा, घरफोडी, दरोड्याची तयारी अशा विविध १५ गुन्ह्यांमध्ये वाँटेड असलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने हडपसर येथून जेरबंद केले आहे.
सोहेल जावेद शेख (वय २८, रा. बिराजदारनगर, हडपसर) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध दरोडा, दरोड्याची तयारी, घरफोडी आदी अनेक गुन्हे दाखल आहेत. मोक्का कारवाईनंतर तो गेल्या वर्षभरापासून जामिनावर बाहेर आला होता.
गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक हडपसर परिसरात फरारी आरोपींचा शोध घेत होते. १६ जून रोजी पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरारी आरोपी सोहेल शेख हा त्याच्या घराजवळील जांभळीच्या झाडाखाली बसून जेवण करत आहे.
या माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने जांभळीच्या झाडाखाली जेवण करत असलेल्या सोहेल शेख याला चारी बाजूंनी घेराव घालून पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता, विश्रामबाग परिसरातील चोरीच्या गुन्ह्याची त्याने कबुली दिली. पुणे शहरातील तब्बल १५ गुन्ह्यांमध्ये तो वाँटेड असल्याचे समोर आले.
सोहेल शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध शरीराविरुद्धचे तसेच मालमत्ताविषयक ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार नितीन मुंढे, प्रदीप परीट, सुजित वाघमारे आणि विनोद महाजन यांनी केली.
