सोलापूर विधान परिषदेसाठी आज मतदान : ६१५ मतदार बजावणार हक्क
सहा केंद्रांवर मतदान प्रक्रिया : मतपेट्यांसाठी स्ट्रॉंग रूम सज्ज
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
सोलापूर : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी आज (गुरुवार, १८ जून) सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. जिल्ह्यात एकूण ६१६ मतदार असून एका नगरसेवकाचे निधन झाल्यामुळे ६१५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
या निवडणुकीत जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य मतदार म्हणून सहभागी होत आहेत. मतदारांना मतपत्रिकेवर पसंती क्रमांक देऊन मतदान करावे लागणार आहे. मतपत्रिकेवर उमेदवारांची नावे मराठी व इंग्रजी भाषेत तसेच पक्षाचे नाव नमूद करण्यात आले असून पक्षचिन्ह छापण्यात आलेले नाही. तसेच या निवडणुकीत ‘नोटा’ अर्थात ‘वरीलपैकी कोणीही नाही’ हा पर्याय उपलब्ध नसणार आहे.
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतपेट्या जिल्हा नियोजन भवन येथे तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर यांनी बुधवारी स्ट्रॉंग रूमची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख आदी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन भवन येथे मतमोजणी केंद्र उभारण्यात आले असून मतदानानंतर मतपेट्या सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतंत्र स्ट्रॉंग रूमची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षक हार्डीकर यांनी पोलीस प्रशासनाला चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व व्यवस्था पूर्ण करण्याचे निर्देशही दिले.
गुरुवार, १८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार असून त्यानंतर २२ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून जिल्हा नियोजन भवन येथे मतमोजणी होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून मतदारांनी वेळेत मतदान केंद्रावर उपस्थित राहून लोकशाहीच्या या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले आहे.
मतदान केंद्रनिहाय मतदार संख्या पुढीलप्रमाणे आहे
उपविभागीय कार्यालय, कुर्डुवाडी – करमाळा, माढा व कुर्डुवाडी येथील स्थानिक स्वराज्य संस्थांचे ८० मतदार.
उत्तर सोलापूर तहसील कार्यालय, सोलापूर – बार्शी, वैराग तसेच सोलापूर महानगरपालिकेतील सदस्यांचे १८७ मतदार.
दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय – अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व मंगळवेढा तालुक्यातील ८९ मतदार.
पंढरपूर तहसील कार्यालय – पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील ७० मतदार.
मंगळवेढा तहसील कार्यालय – मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील ९२ मतदार.
उपविभागीय कार्यालय, माळशिरस – माळशिरस तालुक्यातील ९७ मतदार.
प्रतिष्ठेच्या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत देशमुख यांच्यात थेट सामना होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ, पक्षीय समीकरणे आणि प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीशी जोडली गेल्याने ही लढत विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. दोन्ही उमेदवारांनी मतदानापूर्वी मतदारांशी व्यापक संपर्क साधत विजयासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. त्यामुळे ६१५ मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडतो, याकडे जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आता २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत या प्रतिष्ठेच्या लढतीचा निकाल स्पष्ट होणार आहे.
