सायबरच्या मदतीने हरवलेला मोबाईल शोधला
बार्शी शहर पोलिसांची तत्पर कारवाई; युवतीला अल्पावधीत मिळाला मोबाईल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : पोलीस भरतीच्या शारीरिक सरावादरम्यान हरवलेला मोबाईल बार्शी शहर पोलिसांनी तत्परता दाखवत अल्पावधीत शोधून संबंधित महिलेकडे सुपूर्द केला.
गायत्री विठ्ठल सुतार (रा. बार्शी) या शिवाजी कॉलेज मैदानावर पोलीस भरतीसाठी शारीरिक सराव (फिजिकल प्रॅक्टिस) करत असताना त्यांचा मोबाईल फोन हरवला होता. याबाबत त्यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने शोधमोहीम हाती घेण्यात आली.
पोलीस अंमलदार संतोष जाधवर यांच्या समन्वयातून सायबर शाखेचे रतन जाधव यांनी मोबाईलचे लोकेशन प्राप्त केले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार हवालदार अमोल माने यांनी संबंधित ठिकाणी जाऊन शोधमोहीम राबवली. अथक प्रयत्नांनंतर हरवलेला मोबाईल शोधून काढण्यात यश आले.
त्यानंतर मोबाईलची खातरजमा करून तो सुस्थितीत गायत्री सुतार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. हरवलेला मोबाईल इतक्या कमी वेळात परत मिळाल्याने त्यांनी बार्शी शहर पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.
नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करून त्यांना दिलासा देण्याचे काम बार्शी शहर पोलीस सातत्याने करत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
