स्वतःला ईश्वर भासवणाऱ्या ‘मिश्राबाबा’सह ८ जणांना अटक
महिलेवर १६ वर्षे लैंगिक अत्याचार : खराडी पोलिसांची मध्यरात्री धाड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : स्वतःला ईश्वर असल्याचे भासवून एका कुटुंबाला प्रभावाखाली ठेवत एका महिलेवर तब्बल १६ वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी मुख्य आरोपी राधामोहन मिश्रा उर्फ ‘मिश्राबाबा’ याच्यासह आठ जणांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये राधामोहन मिश्रा (वय ५०), स्वामी कंवल नयन (वय ५८), कीर्ती हंसराज आहुजा (वय ३८), कनिका हंसराज आहुजा (वय ३४), खुशबू गजेंद्र हुडीया (वय ३७), श्वेता अवधबिहारी मिश्रा (वय ३७), अमृता अवधबिहारी मिश्रा (वय ३२) आणि श्वेता संजय पांडे (वय २८, सर्व रा. माऊली सदन, रेणुका पार्क, उबाळेनगर, खराडी) यांचा समावेश आहे.
याप्रकरणी ४१ वर्षीय महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मूळच्या हरियाणा येथील आहेत.
सन २००० मध्ये स्वामी कंवल नयन यांचा त्यांच्या कुटुंबाशी संपर्क आला. त्यानंतर फेब्रुवारी २००१ मध्ये कंवल नयन याने कुटुंबाची भेट राधामोहन मिश्रा याच्याशी घालून दिली.
मिश्रा हा ‘देव’ असून त्याचा अनादर केल्यास नरकात जावे लागेल, अशी भीती कुटुंबाच्या मनात निर्माण करण्यात आली. फिर्यादीचे वडील मिश्रा आणि कंवल नयन यांच्या प्रभावाखाली गेले.
२००३ मध्ये कुरुक्षेत्र येथे त्यांनी सुरू केलेल्या वसतिगृहात फिर्यादीच्या भावाचा प्रवेश करण्यात आला. सेवा करण्यासाठी फिर्यादीचे आई-वडीलही तेथे राहू लागले.
दरम्यान, मिश्रा फिर्यादीला वारंवार बोलावून घेत असे. महिलांच्या प्रसूतीचे व्हिडिओ दाखवून मानसिक छळ करत असे. काठीने मारहाण करून लग्नानंतरचा त्रास सहन करण्याची तयारी आहे का, असे विचारत तो तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता.
२००९ मध्ये फिर्यादीचे लग्न ठरविण्याचा प्रयत्न सुरू असताना मिश्रा याने त्याला विरोध केला. फिर्यादी चारित्र्यहीन असल्याचे सांगून तिच्या आई-वडिलांसमोर तिची मारहाण केली. त्यानंतर २०१० मध्ये सेविका खुशबू हुडीया हिने फिर्यादीला एका खोलीत बोलावून चहा दिला. त्यानंतर मिश्रा याने कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कोणालाही सांगू नये, अशी धमकीही दिली.
यानंतर मिश्रा याने संपूर्ण कुटुंबाला २०१० मध्ये पुण्यात स्थलांतर करण्यास भाग पाडले. सुरुवातीला ते वडगाव शेरी येथे राहत होते. तेथेही त्याने फिर्यादीवर अनेकदा अत्याचार केले.
२०१३ मध्ये कुटुंब उबाळेनगर येथील ‘माऊली सदन’मध्ये राहायला आले. खालच्या मजल्यावर फिर्यादीचे आई-वडील व भाऊ राहत होते, तर वरच्या मजल्यावर मिश्रा व त्याचे अनुयायी राहत होते.
२०१३ ते २०१६ या काळात त्याने फिर्यादीवर वारंवार अत्याचार केले. तिचे नग्न व्हिडिओ तयार केले तसेच शॉक देण्यासारखे अमानुष प्रकारही केले.
२०१६ मध्ये फिर्यादीने हा प्रकार आई-वडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र मिश्रा याने तिच्याबद्दल चुकीची माहिती दिल्याने पालकांनी तिच्यावरच अविश्वास दाखवला.
या जाचातून मुक्त होण्यासाठी तिने ‘शादी डॉट कॉम’च्या माध्यमातून स्थळ शोधून घरच्यांच्या विरोधात जाऊन विवाह केला. विवाहानंतरही मिश्रा याने तिचा छळ सुरूच ठेवला.
तिच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करून एकांतातील व्हिडिओ बनविण्यास भाग पाडले. स्वतःच्या मालकीची वस्तू असल्याप्रमाणे तिच्याशी वर्तन केले.
२०२४ मध्ये पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी दबाव आणला, तर २०२५ मध्ये वडिलांच्या घरात चोरी करण्यास भाग पाडल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.
या सर्व प्रकाराला कंटाळून महिलेने खराडी पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री उबाळेनगर येथील ‘माऊली सदन’वर छापा टाकून आठ जणांना अटक केली.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी अश्लील व्हिडिओ चित्रित केले आहेत का तसेच इतर महिलांचेही लैंगिक शोषण केले आहे का, याचा तपास सुरू आहे.
व्हिडिओ कॅसेटसह १० जिवंत काडतुसे जप्ख – खराडी पोलिसांनी छाप्यात १९ हार्ड डिस्क, २० डिजिटल व्हिडिओ कॅसेट, एक डीव्हीआर, दोन सीपीयू, २३ पेनड्राइव्ह, ६ लाख ६० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, १० जिवंत काडतुसे, मोबाईल फोन असा एकूण २७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, काडतुसांसाठी वापरण्यात येणारे शस्त्र अद्याप सापडलेले नाही.
बंगल्याखाली भुयार तयार करण्याचा होता प्लॅन – उबाळेनगर येथील सुमारे १२ हजार चौरस फुटांच्या जागेवरील बंगल्यात राधामोहन मिश्रा वास्तव्यास होता. हा बंगला फिर्यादीच्या वडिलांनी बांधलेला असून, त्याखाली भुयार तयार करण्याचा आरोपींचा विचार असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तसेच बंगल्यातील एका खोलीत मोठ्या प्रमाणात औषधांच्या गोळ्यांचाही साठा आढळून आला आहे.
