एकाच रात्री पाच ठिकाणी दरोडा टाकणारी टोळी जेरबंद
दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे २३ गुन्हे उघडकीस : ग्रामीण पोलिसांनी २५ लाखांचा माल केला जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : एकाच रात्री चार ठिकाणी दरोडा टाकून लोकांना मारहाण करून लुटणाऱ्या तसेच दौंड, बारामती, जुन्नर परिसरात एकसारख्या पद्धतीने गुन्हे करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीकडून ग्रामीण पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे १५ आणि अहिल्यानगरमधील ८ असे एकूण २३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
गणेश मंगेश काळे (वय २२, रा. कुळधरण, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), विशाल हंबरड्या काळे (वय २१, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड) आणि किशोर रावण भोसले (वय १९, रा. बाभुळगाव खालसा, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून दौंड, बारामती, जुन्नर परिसरात एकसारख्या गुन्हे कार्यपद्धतीचा अवलंब करून जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. नागरिकांना मारहाण करणे, वाटसरूंना हत्याराचा धाक दाखवून लुटणे असे गुन्हे घडले होते. दौंड येथे १० जून रोजी एकाच रात्री चार ठिकाणी आणि श्रीगोंदा येथे एका ठिकाणी दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडे टाकले होते.
याबाबत पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेची बैठक घेऊन सहा पथके तयार केली. २०२६ मधील गुन्ह्यांचा आढावा घेतला.
या सर्व गुन्ह्यांची माहिती संकलित करून साक्षीदार व फिर्यादी यांच्याशी संवाद साधून गुन्ह्यातील आरोपींचे वर्णन घेण्यात आले. घटनास्थळापासून सुमारे ५० किलोमीटरपर्यंत रस्त्यालगत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. हे फुटेज तपासल्यानंतर आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातून गुन्हा करण्यासाठी आले व पुन्हा अहिल्यानगरकडे परतल्याचे दिसून आले.
स्थानिक गुन्हे शाखा तपास करीत असताना १३ जून रोजी हे आरोपी सराईत असून गणेश काळे, विशाल काळे, किशोर भोसले, प्रवीण भोसले व त्यांच्या इतर साथीदारांनी हे गुन्हे केल्याची खात्री झाली.
त्यांच्यावर यापूर्वी सशस्त्र दरोडा, जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. ते घरात न राहता शेतात, माळरानावर, वीटभट्ट्यांवर वेषांतर करून राहत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने रात्रभर तपास करून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आतापर्यंत २३ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे तसेच स्थानिक गुन्हे शाखा, दौंड पोलीस स्टेशन आणि ऊरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी केली.
