आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चालकाला मारहाण करून रिक्षा चोरणारे गुन्हेगार जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 18, 2026
Spread the love

पुणे : रिक्षाचालकाला अडवून मारहाण करून त्याचा मोबाईल, खिशातील रोकड आणि रिक्षा चोरून नेणाऱ्या तिघांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे किरण एडबा झोंबाडे (वय २०, रा. आंबेडकर वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती), पंकज सुभाष पवार (वय २१, रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) आणि कुमार बाळकृष्ण खुडे (वय ३०, रा. जागडे चाळ, अप्पर बिबवेवाडी) अशी आहेत.

रिक्षाचालक १२ जून रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबवेवाडी परिसरातून रिक्षा घेऊन जात असताना दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी त्यांची रिक्षा अडवली.

त्यानंतर त्यांना जबरदस्तीने रिक्षाबाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आरोपींनी त्यांच्या खिशातील मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून घेतली तसेच रिक्षा घेऊन पळ काढला.

याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे आणि रक्षित काळे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी बिबवेवाडी येथील गंगाधाम रोडवरील आईमाता मंदिरामागे थांबलेल्या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी जबरी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेली रिक्षा आणि इतर माल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे तसेच पोलीस अंमलदार संजय गायकवाड, विनोद जाधव, विशाल जाधव, सुमित ताकपेरे, रक्षित काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, राहुल खाडे, ज्योतिष काळे, संतोष बनसोडे, महेश गिरी आणि दत्ता शेंद्रे यांनी केली.