लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू
काही दिवसांवर आलेल्या विवाहसोहळ्यावर शोककळा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका २५ वर्षीय तरुणाचा दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. विशेष म्हणजे, या तरुणाचा विवाह अवघ्या काही दिवसांवर आला होता. त्यामुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केतन विशाल अग्रवाल (वय २५, रा. गहुंजे, पुणे) हा आपल्या होणाऱ्या पत्नीसह आणि मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला होता.
किल्ल्याच्या दक्षिणेकडील कड्याजवळ असताना त्याचा अचानक तोल गेला आणि तो सुमारे ३५० ते ४०० फूट खोल दरीत कोसळला.
या भीषण अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिस, शिवदुर्ग मित्र संस्था, वन्यजीव रक्षक मावळ तसेच स्थानिक ट्रेकर्स यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
बचाव पथकाने सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दरीतून मृतदेह बाहेर काढला. केतन हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता.
त्याचा विवाह काही दिवसांतच पार पडणार होता. विवाहासाठी उदयपूर येथे भव्य सोहळ्याची तयारी सुरू होती. लग्नाच्या तयारीत दोन्ही कुटुंबे व्यस्त असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे आनंदाच्या वातावरणावर शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यात किल्ले आणि दुर्गम पर्यटनस्थळांवर फिरताना पर्यटकांनी अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
