आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भावनिकदृष्ट्या चूक, पण राजकीयदृष्ट्या निर्णय योग्य : ओमराजे निंबाळकरांचे वक्तव्य

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 19, 2026
Spread the love

धाराशिव : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (ठाकरे गट) सोडण्याच्या चर्चांवर प्रथमच भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षांतराचा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा वाटत असला तरी राजकीयदृष्ट्या तो योग्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही खासदार शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना वेग आला असताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याबाबतचे मौन सोडले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना पक्ष सोडण्याचा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा वाटत असला तरी राजकीयदृष्ट्या योग्य असल्याचे सांगितले.

ओमराजे निंबाळकर म्हणाले, “भावनिकदृष्ट्या विचार केला तर हे पाऊल चुकीचे वाटते. मात्र राजकीयदृष्ट्या विचार केला तर तोच निर्णय योग्य ठरतो. सध्या मी मोठ्या धर्मसंकटात आहे.”

खासदार असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतःचे कार्यकर्ते निवडून येत नसतील, तर भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच मतदारसंघातील रस्ते, पूल, डीपी यांसारख्या विकासकामांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित निधी मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. सत्ता आणि निधीच्या अभावामुळे जनतेची कामे करता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून मोठा दबाव असल्याचे सांगताना त्यांनी वडील पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच पक्षांतरासाठी पैसे घेतल्याच्या आणि वाय प्लस सुरक्षा मिळाल्याच्या चर्चा पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघाच्या विकासासाठीच हा निर्णय विचाराधीन असल्याचा दावाही त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना ते म्हणाले की, हे दोन्ही नेते सातत्याने जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये फिरत असतात. तर उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणामुळे सक्रिय राहणे शक्य नसले तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय भूमिका घ्यायला हवी होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, आमदार कैलास पाटील यांनी अद्याप ओमराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क झालेला नसल्याचे सांगितले. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत होणाऱ्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात आणि कोणत्या सूचना देतात, त्यानुसार पुढील रणनीती ठरवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.