आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

विवाहितेची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 19, 2026
Spread the love

पुणे : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात कार्यरत असताना दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले आणि त्यांनी प्रेमविवाह केला. मात्र, आधुनिक क्षेत्रात काम करत असूनही पती व त्याचे नातेवाईक जुन्या विचारसरणीचे असल्याने विवाहानंतर मुल होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत होता. या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रोड परिसरात घडली.

दीप्ती प्रदीप एकशिंगे (वय २७, रा. माणिकबाग, सिंहगड रोड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी पती प्रदीप विठ्ठल एकशिंगे, सासू सुरेखा विठ्ठल एकशिंगे (दोघे रा. माणिकबाग, सिंहगड रोड) तसेच त्यांच्या इतर नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत दीप्ती हिचे भाऊ डॉ. किरण तुषार दुधबळे (वय ३०, रा. गडचिरोली) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १७ जून रोजी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप आणि दीप्ती हे दोघेही आयटी क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्यात प्रेमसंबंध जुळल्यानंतर त्यांनी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेमविवाह केला. विवाहानंतर काही काळाने दीप्तीने नोकरी सोडली होती.

दीप्तीच्या सासूला नातवाचे तोंड पाहण्याची घाई होती. लग्नानंतर मूल होत नसल्याच्या कारणावरून पती, सासू आणि इतर नातेवाईक तिचा वारंवार मानसिक छळ करत होते.

तसेच क्षुल्लक कारणांवरून मारहाण करून तिला त्रास दिला जात होता, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून दीप्तीने १७ जून रोजी राहत्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार आडगळे करीत आहेत.