आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कात्रज-कोंढवा रोडवरील वाहतुकीत बदल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 19, 2026
Spread the love

पुणे : कात्रज चौक ते राजस सोसायटी दरम्यान सुरू असलेल्या सहापदरी उड्डाणपुलाच्या सेगमेंटल लॉंचिंगचे काम शुक्रवारपासून सुरू झाले आहे. या कामामुळे कात्रज-कोंढवा रोडवरील वाहतुकीत १९ जूनपासून बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

कोंढवा ते कात्रज येथे जाणाऱ्या वाहनांनी राजस सोसायटी चौकातील राजस पुलावरून न जाता शेजारील सर्व्हिस रोडने सरळ इच्छित स्थळी जावे.

राजस पुलावरील वाहतूक ही फक्त कात्रज ते कोंढवा रोडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पुढील आदेशापर्यंत एकेरी करण्यात आली आहे.

कात्रज तलावाकडून येणाऱ्या वाहनांना राजस सोसायटी चौक किंवा कोंढव्याकडे जाण्यासाठी डावीकडे वळून सर्व्हिस रोडने राजस पुलावरून कोंढव्याकडे इच्छित स्थळी जाता येईल.

राजस सोसायटीकडून कात्रजकडे जाणाऱ्या वाहनांनी कपिला डेअरी येथून यू-टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे, असे पोलिसांच्या आदेशात म्हटले आहे.