निवृत्त सहायक पोलीस आयुक्तवर गुन्हा दाखल
सुनेचा केला छळ : सासर्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताने आपल्या सुनेकडे शरीरसुखाची मागणी करून तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच पती, सासू आणि नणंदांकडून मारहाण व छळ केल्याप्रकरणी निवृत्त एसीपीसह सात जणांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती विक्रांत सुरेश घाडगे, सासरे सुरेश रामचंद्र घाडगे, सासू सुनंदा सुरेश घाडगे (सर्व रा. डीएसके गार्डन इन्क्लेव्ह, वेलकम हॉलजवळ, पारगेनगर, कोंढवा), नणंद स्नेहल प्रवीण सर्जेराव व तिचे पती प्रवीण सर्जेराव (रा. अकोला), तसेच नणंद वैशाली विक्रम राऊत व तिचे पती विक्रम राऊत (रा. अंधेरी, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ३० वर्षीय विवाहितेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १७ एप्रिल २०२२ ते ८ मे २०२६ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातून उपसचिव पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या मित्रामार्फत विक्रांत घाडगे यांचे स्थळ आले होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये विमाननगर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा साखरपुडा झाला. त्यावेळी विक्रांत याने दीड लाख रुपयांची अंगठी घेण्यास भाग पाडले, तर त्याने स्वतः मात्र ६० हजार रुपयांची अंगठी दिली होती. एप्रिल २०२२ मध्ये सासवड येथे विवाह झाला. साखरपुडा आणि विवाह सोहळ्यासाठी फिर्यादीच्या वडिलांकडून सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च करून घेण्यात आल्याचा आरोप आहे.
विवाहानंतर सासूने सर्व दागिने स्वतःकडे ठेवून घेतले. विक्रांत हा बाहेर जाताना पत्नीला घरात कोंडून ठेवत असे. तसेच तिला नोकरी सोडण्यास भाग पाडले आणि सोशल मीडियावरील खाती बंद करण्यासही दबाव टाकला.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, विक्रांत याचे इतर महिलांशी अनैतिक संबंध होते. तो घरात विविध महिलांना आणून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असे. याबाबत जाब विचारल्यानंतर, “तू घरी नसताना शारीरिक सुखाशिवाय राहणे मला शक्य नाही, म्हणून मी माझ्या मैत्रिणींना घरी आणतो,” अशी कबुली देत त्याने माफी मागितली होती. मात्र, त्यानंतरही त्याचे हे प्रकार सुरूच राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
८ मे २०२६ रोजी दुपारी फिर्यादी घरी असताना सासरे सुरेश घाडगे यांनी तिच्याशी वाद घातला. “मी तुझा सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) काढला आहे. तू रोज तुझ्या आईशी बोलतेस. तुला आम्ही वारंवार समजावून सांगितले होते,” असे म्हणत त्यांनी तिच्या भावाबरोबरच्या नात्यावरही संशय व्यक्त केला. विक्रांत व त्याच्या कुटुंबीयांकडून होत असलेल्या अत्याचारामुळे आणि जीवितास धोका निर्माण झाल्याने फिर्यादी आपल्या भावासोबत माहेरी निघून गेली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस करीत आहेत.
एसीपीची भष्ट्राचाराची कबुली
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, निवृत्त एसीपी सुरेश घाडगे हे वारंवार धमक्या देत असत. “मी एसीपी होतो. आयुष्यभर गुन्हेगार पाहिले आहेत. पुरावे कसे तयार करायचे आणि कसे नष्ट करायचे हे मला चांगले माहिती आहे. माझ्याकडे भरपूर पैसा आहे. गरज पडल्यास कायदाही विकत घेऊ शकतो. चाकणमध्ये नोकरी करत असताना मी कोट्यवधी रुपये कमावले आहेत. पैसे ठेवायला जागा नसल्याने बादल्यांमध्ये भरून ठेवत होतो,” असे ते सांगत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच, “माझ्याकडे बंदूक आहे. तुला इथेच मारून गाडून टाकेन,” तसेच “विरोध केलास तर कोयत्याने कापून टाकेन,” अशा धमक्याही दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
