ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्याने उच्चशिक्षित तरुण बनला चोरटा
पैशांसाठी मोबाईलमधील सिमकार्डची चोरी करून बँक खाती केली खाली : रेल्वे पोलिसांनी केले अटक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : ऑनलाईन गेमच्या आहारी गेलेल्या एका उच्चशिक्षित तरुणाने लोकांच्या मोबाईलमधील सिमकार्ड चोरून त्याचा वापर करून त्यांच्या नावावर कर्ज घेतले आणि बँक खाती रिकामी केली. पुणे रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममधील प्रवाशांची चोरी करणाऱ्या या तरुणाला रेल्वे पोलिसांनी सलग ११ दिवस पाळत ठेवून अटक केली.
संकेत सतीश कुलकर्णी (वय २३, रा. सरोवर हौसिंग सोसायटी, जिजामाता चौक, आकुर्डी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने रेल्वेच्या वेटिंग रूममधील तीन प्रवाशांच्या मोबाईलमधील सिमकार्ड चोरी केली होती.
याबाबत विनोद सदाशिव रेणके (वय ४७, रा. सांगली) हे २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून २३ जानेवारीपर्यंत पुणे रेल्वे स्टेशन येथील स्लीपर वेटिंग रूममध्ये मोबाईल फोन चार्जिंगला लावून बसले होते. काही वेळाने त्यांनी मोबाईल तपासला असता त्यामध्ये सिमकार्ड नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी त्याच क्रमांकाचे नवीन सिमकार्ड घेतले. ते मोबाईलमध्ये टाकताच त्यांच्या नावावर ऑनलाईन कर्ज घेऊन १ लाख १३ हजार रुपयांची फ्लिपकार्टद्वारे खरेदी करण्यात आल्याचे तसेच त्यांच्या बँक खात्यातून ४ हजार ५०० रुपयांचे व्यवहार झाल्याचे संदेश प्राप्त झाले. याप्रकरणी त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली.
या गुन्ह्याचा तपास करताना वेटिंग रूममधील सीसीटीव्ही बंद असल्याने आरोपीचा फोटो किंवा सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होऊ शकले नाही. आरोपी सतत सिमकार्ड बदलत असल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. दरम्यान, २९ मे २०२६ रोजी पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा पुणे रेल्वे स्टेशनवरील स्लीपर वेटिंग रूम क्रमांक २ मध्ये घडला. वेटिंग रूम, प्लॅटफॉर्म आणि इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संशयित आरोपीचा फोटो आणि फुटेज मिळाले.
अशा प्रकारच्या चोऱ्या करण्यासाठी तो पुन्हा येण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी सलग ११ दिवस पाळत ठेवली. त्यानंतर ९ जून २०२६ रोजी संकेत कुलकर्णी पुन्हा पुणे रेल्वे स्टेशनवर आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ऑनलाईन गेम खेळण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने तो हे प्रकार करत असल्याचे त्याने सांगितले. तो सिमकार्ड चोरी करून ते स्वतःच्या मोबाईलमध्ये टाकत असे. त्यानंतर पीडित व्यक्तीचे जीमेल खाते उघडून गुगल फोटोजमधून आधार कार्ड किंवा डेबिट कार्डचे फोटो मिळवत असे.
त्याद्वारे फोनपे, पेटीएम आदी अॅप्सचा पिन बदलून संबंधितांच्या खात्यातून पैसे काढणे, त्यांच्या नावावर कर्ज घेणे, ऑनलाईन वस्तू खरेदी करणे असे प्रकार तो करत होता. अशा प्रकारचे तीन गुन्हे त्याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, पोलीस उपनिरीक्षक शंभू रणवरे, साळुंखे, पोलीस हवालदार साळुंखे, भोसले, कांबळे तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक दादासो लाड, विशाल मोरे आणि आरक्षक युवराज गायकवाड यांनी केली.
ही काळजी घ्या :
लोकांनी आपली पेमेंट गेटवे, फोन पे पेटीएम, व इतर अन्य प्रकारचे अॅप याचा वापर अन्य व्यक्तीने करु नये म्हणुन स्वतच्या मोबाईलला फिंगर प्रिंट, पिन लॉक सारखी सुरक्षा लावावी.
आपल्या फोन मधील गुगल फोटोज मधील फोटो इतरांना पाहता येणार नाही यासाठी लॉक लावावे.
आपले सीम कार्ड इतरांनी वापरु नये म्हणुन सीमकार्ड लॉक या ऑपशन वापर करावा. त्यामुळे सीमकार्ड चोरुन होणार्या फसवणुकीपासून आपण स्वतःला वाचवु शकाल.
