आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

डेली कलेक्शनच्या नावाने छोट्या व्यवसायिकांना गंडा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 20, 2026
Spread the love

पुणे : विमाननगर परिसरातील छोट्या व्यवसायिकांकडून एलआयसीच्या नावाने डेली कलेक्शनच्या माध्यमातून गेली काही वर्षे दररोज पैसे घेऊन लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्यांनी पैसे गुंतवले होते, त्या व्यावसायिकांनी त्याला पकडून विमानतळ पोलिसांसमोर हजर केले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

लक्ष्मण रावसाहेब चोपडे (वय ३८, रा. गावठाण, मु. औरंगपूर, पो. निमगाव जाळी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे या भामट्याचे नाव आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याची ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. याबाबत नागनाथ केरबा बासे (वय ५२, रा. शंकरनगर, खराडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२३ ते २०२५ या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागनाथ बासे हे विमाननगरमधील दत्त मंदिर चौकात नारळपाणी विक्रीचा व्यवसाय करतात. लक्ष्मण चोपडे याने एलआयसीमध्ये पैसे गुंतवतो, असे सांगून त्यांच्याकडून दररोज डेली कलेक्शन म्हणून ३२० रुपये घेतले. त्यांना त्याबाबतचे पुस्तकही दिले होते.

२०२५ मध्ये ते विमाननगर येथील एलआयसी कार्यालयात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी २०२३ पासून तुमचे खाते बंद असून त्यामध्ये कोणतेही पैसे जमा करण्यात आलेले नाहीत, असे सांगितले.

यानंतर त्यांनी लक्ष्मण चोपडे याला फोन करून विचारणा केली. तेव्हा त्याने, “मी तुमचे पैसे एका हॉटेल व्यवसायामध्ये गुंतवले आहेत. मी तुमचे पैसे काही दिवसांत परत करेन,” असे सांगितले. त्यावर त्यांनी विश्वास ठेवला. त्यानंतर त्यांनी चोपडे याला वारंवार फोन केले; मात्र, त्याने फोन उचलला नाही.

त्यामुळे ते त्याच्या चंदननगर येथील कार्यालयात गेले. तेव्हा त्यांच्याप्रमाणेच आणखी काही जणांचीही त्याने फसवणूक केल्याचे समोर आले. गफार मेहबुब शेख (वय ५५, रा. विमानदर्शन, संजय पार्क, विमाननगर) यांची ३० लाख रुपये आणि सुनिल नामदेव शिंदे (वय ४०, रा. गावडे वस्ती, वाडेबोलाई, ता. हवेली) यांची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. आणखीही काही जणांची लक्ष्मण चोपडे याने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

हे सर्वजण त्याचा शोध घेत असताना तो त्यांना दिसला. त्यांनी त्याला पकडून विमानतळ पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

लक्ष्मण चोपडे याने तिघा जणांची एकूण ४३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. पोलीस उपनिरीक्षक हर्षल घोगरे पुढील तपास करीत आहेत.