आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

आठव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 20, 2026
Spread the love

पुणे : रंगकामासाठी बांबू बांधण्याचे काम करत असताना आठव्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला. कामगाराला आवश्यक सुरक्षा साधने न पुरविल्याने निष्काळजीपणा केल्याबद्दल वारजे माळवाडी पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ज्योति सुरेशसाह बंजारिया (वय ३०, रा. गोपालगंज, बिहार) असे मृत्यू पावलेल्या कामगाराचे नाव आहे. हेमंत नागेश चव्हाण (वय ४५, रा. आनंद पार्क, शिवशक्ती नगर, वडगाव शेरी) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार विक्रम केशव खिलारी (वय ३३) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदार हेमंत चव्हाण हे वारजे परिसरातील आदित्य गार्डन सिटीच्या फेज-३ मधील ‘आय’ नावाच्या इमारतीवर रंगकामासाठी बांबू बांधण्याचे काम गुरुवार, १८ जून रोजी कामगारांकडून करून घेत होते. कामगारांना हेल्मेट, सुरक्षित जाळी, सेफ्टी बेल्ट आदी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक साधनसामग्री पुरविणे बंधनकारक होते. मात्र, ठेकेदाराने ती पुरविली नव्हती.

बांबूचा सांगाडा उभारत असताना सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास नियमानुसार सेफ्टी नेटदेखील लावण्यात आले नव्हते. त्यामुळे बंजारिया याचा तोल जाऊन तो आठव्या मजल्यावरून खाली पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर रायगोंडा पुढील तपास करीत आहेत.