आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

ड्रिम्स कॉर्पोरेशनच्या संचालकांवर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 22, 2026
Spread the love

पुणे : विविध बांधकाम प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून त्याबदल्यात परतावा दिला नाही. तसेच गुंतवणूक केलेल्या रकमेच्या बदल्यात फ्लॅट देण्याचे आश्वासन देऊन तेही न पाळता ८ कोटी ८१ लाख ९२ हजार २५२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ड्रिम्स कॉर्पोरेशनच्या चार संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

रमेश घिसुलाल मेहता (संचालक, ड्रिम्स कॉर्पोरेशन, सिटी मॉल, गणेशखिंड रोड), उमेश शशिकांत अंबर्डेकर (रा. शंकर महाराज सोसायटी, बिबवेवाडी), हंसमुख प्रकाश बांटीया (रा. पंचशील हौसिंग सोसायटी, रहेजा टाऊनशिप, मालाड ईस्ट, मुंबई) आणि हितेश सुभाष लोढा (रा. सदा सोबा, चंद्रविजय हौसिंग सोसायटी, महर्षीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत राजेश शेषमल कोठारी (वय ५७, रा. सिल्व्हन रिट्रीट अपार्टमेंट, रेंजहिल रोड, अशोकनगर, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

हा प्रकार गणेशखिंड रोडवरील सिटी मॉलमधील ड्रिम्स कॉर्पोरेशनच्या कार्यालयात सप्टेंबर २००९ ते मार्च २०१७ या कालावधीत घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश मेहता व इतर हे ड्रिम्स कॉर्पोरेशन कंपनीचे संचालक आहेत. ड्रिम्स कॉर्पोरेशनच्या विविध बांधकाम प्रकल्पांमध्ये फिर्यादी राजेश कोठारी व त्यांची आई प्रेमा कोठारी यांनी रमेश मेहता यांच्या वैयक्तिक बँक खात्यात वेळोवेळी ८ कोटी ८१ लाख ९२ हजार २५२ रुपयांची गुंतवणूक केली होती.

मात्र, त्यावर कोणताही परतावा देण्यात आला नाही. कोठारी यांनी वारंवार परतावा तसेच मूळ रक्कम परत करण्याची मागणी केली. त्यावेळी आरोपींनी गुंतवणुकीच्या रकमेच्या बदल्यात विविध बांधकाम प्रकल्पांमध्ये तेवढ्याच किमतीचे फ्लॅट देण्याचे मान्य केले होते.

त्यासाठी नोटराइज एमओयूही करण्यात आला होता. मात्र, असे असतानाही फिर्यादींना आजपर्यंत कोणताही फ्लॅट देण्यात आला नाही. राजेश कोठारी यांनी वारंवार मागणी करूनही आरोपींनी ना फ्लॅट दिले, ना गुंतवलेली रक्कम परत केली.

अखेर त्यांनी शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाची पडताळणी केल्यानंतर शनिवारी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे करीत आहेत.