सूर्यदत्तचा ‘सूर्यभारत सुर-संगम पीसथॉन २०२६’ उपक्रम
‘योग फॉर हेल्दी एजिंग’चा संदेश : २१ भारतीय भाषांमध्ये योग प्रोटोकॉल सादर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित ‘सूर्यभारत सूर-संगम पीसॅथॉन २०२६’ या उपक्रमाने विश्वविक्रमाची नोंद केली. २,०२६ हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व साधकांनी प्रत्यक्ष आणि ऑनलाइन माध्यमातून सहभाग नोंदवत योगाच्या माध्यमातून शांतता, एकात्मता आणि निरोगी जीवनाचा संदेश दिला.
बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे आयोजित ‘सूर्यभारत सूर-संगम पीसॅथॉन २०२६’ या अभिनव उपक्रमाने विश्वविक्रमाची नोंद केली.
‘योग फॉर हेल्दी एजिंग’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात २,०२६ हून अधिक विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक आणि विविध संस्थांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे २१ भारतीय भाषांमध्ये सादर करण्यात आलेला ‘मल्टीलिंग्वल योग प्रोटोकॉल’. मराठी, हिंदी, संस्कृत, पंजाबी, काश्मिरी, बंगाली, गुजराती, कन्नड, तेलुगू, ओडिया, मल्याळम, सिंधी, मैथिली, कोकणी, भोजपुरी, मारवाडी, गढवाली, हरियाणवी, छत्तीसगढी, मगधी आणि इंग्रजी भाषांमधून योगसत्रांचे संचालन करण्यात आले.
‘अनेक भाषा, एक श्वास आणि एकच शांततेचा संदेश’ ही संकल्पना या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आली. कार्यक्रमादरम्यान सहभागींच्या उपस्थितीत भव्य ‘मानवी तिरंगा’ साकारण्यात आला.
विविध भाषा, संस्कृती आणि परंपरा असल्या तरी शांतता, प्रेम आणि योग हा मानवतेला जोडणारा समान धागा असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
योगासन स्पर्धेत विद्यार्थी गटातून भक्ती परदेशी हिने प्रथम, अनिश त्रिंबस्कडे याने द्वितीय, तर शिवानी गणेश वाघमारे हिने तृतीय क्रमांक मिळविला.
प्राध्यापक गटात डॉ. सुनेत्रा गायतोंडे प्रथम, प्रा. अमर शिंदे द्वितीय आणि प्रा. सारंग मुळावेकर तसेच ऋचा वर्ष्णेय यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
योग प्रशिक्षक सोनाली ससार, मीनल गावंडे आणि सविता गांधी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान दिले.
या उपक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना, व्यापक सहभाग आणि सामाजिक परिणाम लक्षात घेऊन ‘इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड्स’ संस्थेने ‘लार्जेस्ट सिंक्रोनाइझ्ड योगा इव्हेंट प्रमोटिंग युनिटी इन डायव्हर्सिटी – सूर्यभारत सूर-संगम पीसॅथॉन २०२६’ या उपक्रमाची ‘मास अटेम्प्ट’ प्रकारात अधिकृत विश्वविक्रम म्हणून नोंद केली.
योग ही भाषा, संस्कृती आणि सीमांच्या पलीकडे जाऊन मानवतेला एकत्र आणणारी वैश्विक भाषा आहे. ‘योग फॉर हेल्दी एजिंग’ ही संकल्पना प्रत्येक व्यक्तीला आयुष्यभर निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवन जगण्याचा संदेश देते. – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
