आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सराईत गुन्हेगाराला पकडताना पोलिसांवर हल्ला

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 22, 2026
Spread the love

पुणे : घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित दुचाकीचा पाठलाग करत असताना सराईत गुन्हेगाराने सहायक पोलीस निरीक्षक गणेश रायकर यांच्यावर चाकूहल्ला केला. त्यानंतर गणेश रायकर यांनी आपल्याकडील पिस्तुलातून गोळीबार केला. या गोळीबारात गुन्हेगाराच्या डाव्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला. यावेळी त्याच्या साथीदाराने पोलीस हवालदाराच्या अंगावर दुचाकी घालून पळ काढला. ही घटना रामटेकडीतील आनंदनगर येथील गल्ली क्रमांक ५ मधील रस्त्यावर रविवारी सकाळी सुमारे ६ वाजता घडली. पळून गेलेला साथीदार रविवारी रात्री वानवडी पोलीस ठाण्यात हजर झाला.

गणेश पंडित रायकर (वय ३८) असे जखमी झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांचे नाव आहे. ते सध्या बाणेर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. चाकूहल्ल्यात त्यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे.

त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून करणसिंग रजपूतसिंग दुधानी (वय २९, रा. रामटेकडी, हडपसर) आणि बिंतुसिंग शामसिंग कल्याणी (वय ३०, रा. रामटेकडी, हडपसर) यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करणसिंग दुधानी याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर बिंतुसिंग कल्याणी याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. बाणेर-पाषाण लिंक रोडवरील व्हॅलेन्सिया अपार्टमेंट येथे १४ व १५ जूनदरम्यान घरफोडी करून चोरट्यांनी ५ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.

याप्रकरणी मिलिन दिलीप गडा (वय ३५) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश रायकर यांच्याकडे होता.

तपासादरम्यान त्यांना एक संशयित दुचाकी आढळून आली. त्या दुचाकीच्या मालकाकडे चौकशी केली असता त्याने आपली दुचाकी चोरीला गेल्याचे सांगितले.

गणेश रायकर आणि पोलीस हवालदार बाबासाहेब आहेर हे गुन्हेगारांचा शोध घेत असताना त्यांना चोरीच्या दुचाकीवरून दोघेजण जाताना दिसले. त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला.

आनंदनगरमधील एका गल्लीत त्यांनी पोलीस व्हॅन आडवी घालून त्यांना रोखले. गणेश रायकर हे खाली उतरून आरोपींना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या जवळ गेले असता, पाठीमागे बसलेल्या करणसिंग दुधानी याने अटक टाळण्यासाठी त्याच्याकडील लोखंडी हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रायकर यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली.

स्वसंरक्षणासाठी आणि आरोपीला अटकाव करण्यासाठी रायकर यांनी त्याच्या पायाच्या दिशेने आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून एक राऊंड फायर केला. त्यामध्ये करणसिंग दुधानी जखमी झाला.

त्यानंतर त्याने स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून घेतले आणि पकडण्याचा प्रयत्न केल्यास स्वतःला आणखी इजा करून घेण्याची धमकी दिली.

पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले असता त्याने गणेश रायकर यांच्या हातातील रिव्हॉल्व्हर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि शासकीय कामात अडथळा आणला.

दरम्यान, बिंतुसिंग कल्याणी याने पोलीस हवालदार बाबासाहेब आहेर यांच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तेथून पळून गेला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, पोलीस निरीक्षक दादासाहेब डाबेराव आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. गणेश रायकर आणि करणसिंग दुधानी यांना तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दादासाहेब डाबेराव करीत आहेत.