प्रेमसंबंधात अडथळा असणाऱ्या भावी पतीचा खून
लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या केतन अगरवालचा होणाऱ्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने केला खून : ग्रामीण पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लोहगड किल्ल्यावर फिरायला गेले असताना पाय घसरून दरीत पडल्याने केतन अगरवाल याचा मृत्यू झाल्याचे सुरुवातीला समोर आले होते. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात १८ जून २०२६ रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
या प्रकरणात १८ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूस झुडपांमध्ये केतन विशाल अगरवाल (वय २५ वर्षे, रा. लोढा बेलमॅडन्डो टॉवर, गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) यांचा मृतदेह आढळून आला होता.
केतन अगरवाल यांचे सिया गोयल (रा. मार्केट यार्ड, पुणे) हिच्यासोबत लग्न ठरले होते. त्यामुळे दोघेही लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते.
किल्ला फिरत असताना केतन अगरवाल यांचा पाय घसरून ते किल्ल्यावरून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सिया गोयल हिने दिली होती.
त्यानुसार हर्ष कुलदीप अगरवाल (रा. लोढा बेलमॅडन्डो टॉवर, गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
या प्रकरणाची पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्वतः दखल घेत सविस्तर माहिती घेतली आणि समांतर सखोल चौकशी करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.
त्यासाठी दोन विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली. ही घटना प्रथमदर्शनी संशयास्पद वाटल्याने पथकाने यामध्ये मालमत्तेचा वाद अथवा प्रेमसंबंधातून काही कारण आहे का, याचा तपास सुरू केला.
तपासादरम्यान सिया गोयल हिचे अन्य व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर केतन अगरवाल यांचे वडील विशाल देवीचंद अगरवाल (वय ४६ वर्षे, रा. लोढा बेलमॅडन्डो टॉवर, गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी सिया प्रविण गोयल हिचे चेतन चौधरी याच्यासोबत प्रेमसंबंध असून दोघांनी संगनमत करून केतन अगरवाल यांना लोहगड किल्ल्यावरून ढकलून देत खून केल्याची फिर्याद लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली.
त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी चेतन बाबुलाल चौधरी (वय २२ वर्षे, रा. पार्श्वनगर, बी-४/३०१, कोंढवा बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे) याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचे प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, सिया गोयल हिचे लग्न केतन अगरवाल यांच्यासोबत ठरले होते.
तिला केतन अगरवाल यांच्याशी लग्न करायचे नव्हते आणि ते त्यांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने चेतन चौधरी व सिया प्रविण गोयल यांनी कट रचला.
\योजनेनुसार सिया गोयल हिने केतन अगरवाल यांना लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी नेले. त्यानंतर प्रियकर चेतन चौधरी याला मागून बोलावून घेऊन दोघांनी मिळून केतन अगरवाल यांना किल्ल्यावरून ढकलून देत त्यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या गुन्ह्यात सिया प्रविण गोयल (वय २० वर्षे, रा. लिलाकुंज, ७८/२१, न्यू एरा सोसायटी, गंगाधाम समोर, कोंढवा रोड, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, पुणे) हिलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार तसेच पोलीस अंमलदार संतोष शेळके, तुषार भोईटे, गणेश होळकर, संजय पडयाळ, अजित भुजबळ, अमोल शेडगे, भारत मोहोळ, चेतन पाटील, गणेश धनवे, संतोष भापकर, वैभव सावंत, अजय देडे, भाऊसाहेब पुंड, समीर तांगडे, नंदा कदम, सुजाता कदम, शरयू बिरंबुळे, जय पवार, सागर धनवे, अमोल कसबेकर, पंडित, पवन कराड आणि सचिन गायकवाड यांनी केली.
