‘वर्षा’ निवासस्थानी BJS वाघोली च्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
WERCच्या ३२ वर्षांच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रवासातील यशोगाथांना सलाम : ‘फिनिक्स (यशोगाथा)’ पुस्तकाचे प्रकाशन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
मुंबई : भारतीय जैन संघटना (BJS) संचालित वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाच्या (WERC) गेल्या ३२ वर्षांच्या कार्यातून घडलेल्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांच्या गौरवार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत ‘वर्षा’ निवासस्थानी विशेष अभिनंदन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी लातूर भूकंपग्रस्त, अनाथ, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील तसेच आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांपैकी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात पद्माकर गोरे लिखित ‘फिनिक्स (यशोगाथा)’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या बळावर स्वतःचे आयुष्य घडविणाऱ्या WERCच्या विद्यार्थ्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाची यशोगाथा या पुस्तकात उलगडण्यात आली आहे.
हा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिव्यज फाउंडेशनच्या संस्थापक अमृता फडणवीस, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, दिविजा फडणवीस, BJS चे व्यवस्थापकीय संचालक विलास राठोड आणि कोमल जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सातत्याने कार्यरत असलेल्या WERC प्रकल्पाने हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे.
शिक्षण, संस्कार आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून घडलेल्या या यशस्वी जीवनप्रवासांचा गौरव करताना हा सोहळा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.
शिक्षणाच्या सामर्थ्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा हा उत्सव समाजासाठी आशादायी संदेश देणारा ठरला.
