आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दुबईतील सोन्याचा मोह पडला महागात

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 24, 2026
Spread the love

पुणे : दुबईतील मॉलमध्ये काम करत असताना स्वतःला एमिरेट्स एअरलाईन्समध्ये एचआर पदावर कार्यरत असल्याचे सांगून, दुबईतून स्वस्तात सोने आणून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

तेजस तानाजी मोहिते (वय २६, रा. शाहूनगर, साई मंदिरामागे, पिंपरी-चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत हडपसर येथील एका ३१ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा हडपसर येथे ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. त्यांच्या मैत्रिणीचा तेजस मोहिते हा फेसबुक फ्रेंड आहे. त्याने स्वतःला दुबईतील एमिरेट्स एअरलाईन्समध्ये एचआर पदावर कार्यरत असल्याचे सांगितले होते. २ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादी यांनी आपल्या मैत्रिणीकडे तेजसकडे दुबईतील सोन्याच्या दराबाबत चौकशी करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने सोन्याचा भाव १ लाख १ हजार रुपये प्रति तोळा असल्याचे सांगितले. त्याच वेळी भारतात सोन्याचा भाव सुमारे दीड लाख रुपये प्रति तोळा होता.

तेजसने ४ फेब्रुवारी २०२६ रोजी तो भारतात येणार असून, त्याला सोबत ३० ग्रॅम सोने आणता येते, असे सांगितले. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला ३ लाख ४ हजार रुपये पाठविले. त्यानंतर त्याने, “माझ्यासोबत आणखी दोन मित्र भारतात येणार असून तेही प्रत्येकी ३० ग्रॅम सोने घेऊन येऊ शकतात,” असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी त्याला एकूण ६ लाख ५९ हजार रुपये पाठविले. त्याने सोने खरेदी केल्याची पावतीदेखील पाठविली.

मात्र, युद्धामुळे विमान रद्द झाल्याचे कारण तो वारंवार सांगू लागला. त्यामुळे फिर्यादींना संशय आला. त्यांनी दुबईतील सोन्याचा भाव तपासला असता, तो १ लाख ४३ हजार ३६० रुपये प्रति तोळा असल्याचे आढळले. तेजसने फसवणूक करण्याच्या उद्देशाने १ लाख १ हजार रुपये दर सांगितल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच त्याने पाठविलेली पावतीही बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर फिर्यादी यांनी त्याच्याकडे पैसे परत मागितले. त्यावेळी “भारतात आल्यानंतर तुमचे पैसे परत करतो,” असे आश्वासन त्याने दिले. २१ मार्च २०२६ रोजी तेजस मोहिते भारतात आला. मात्र, त्याने फिर्यादी यांचे पैसे परत केले नाहीत. त्यामुळे त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हडपसर पोलिसांनी तेजस मोहिते याला अटक केली. तपासात तो कोणत्याही एअरलाईन्समध्ये कार्यरत नसून दुबईतील एका मॉलमध्ये काम करत असल्याचे समोर आले. न्यायालयाने त्याला अधिक तपासासाठी शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.