घाऊक पद्धतीने डिझेल विकणे पडले महागात
पेट्रोल पंप व्यवस्थापकासह टेम्पोचालकावर गुन्हा : १२०० लिटर डिझेलची बॅरलमधून विक्री
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल व डिझेलच्या घाऊक विक्रीवर निर्बंध घालण्यात आले असतानाही एका व्यक्तीला सहा बॅरलमधून १२०० लिटर डिझेल विकल्याप्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाने कारवाई केली आहे. १२०० लिटर डिझेल घेऊन जाणारा पिकअप टेम्पो जप्त करण्यात आला असून, पेट्रोल पंप व्यवस्थापकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रद्धा दत्तात्रय टेकवडे (वय ३४, रा. भेकराईनगर) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पेट्रोल पंप व्यवस्थापक रोहन रवींद्र सणस (रा. सद्गुरू हौसिंग सोसायटी, चंदननगर) आणि टेम्पोचालक सत्यवान हेमचंद्र सातव (रा. भावडी रोड, वाघोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २२ जून रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता शिरसवडी येथील वाडे बोल्हाई–राहू रोडवरील भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या पेट्रोल व डिझेलच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर घाऊक औद्योगिक ग्राहकांकडून किरकोळ विक्री केंद्रांवरून मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी केल्याच्या घटना निदर्शनास आल्याने शासनाने ५ जून रोजी आदेश जारी करून अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशानुसार जिल्हा पुरवठा विभागाचे पथक पेट्रोल व डिझेलचा अवैध वापर रोखण्यासाठी गस्त घालत होते.
त्यावेळी वाडे बोल्हाई–राहू रस्त्यालगत असलेल्या भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर एका महिंद्रा पिकअप वाहनामध्ये नऊ प्लास्टिकच्या बॅरलमध्ये डिझेल भरले जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. चौकशी केली असता, चालक सत्यवान सातव याने कंपनीच्या कामकाजासाठी वाघोली येथे डिझेल घेऊन जात असल्याचे सांगितले. तर पेट्रोल पंप व्यवस्थापक रोहन सणस यांनी अशा प्रकारे पेट्रोल व डिझेलची विक्री करत असल्याचे सांगितले.
यानंतर लोणीकंद पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले. पुरवठा विभागाने सहा बॅरलमधील १२०० लिटर डिझेल, तीन रिकामे बॅरल आणि सुमारे पाच लाख रुपये किमतीचा पिकअप टेम्पो असा एकूण ६ लाख १८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे करीत आहेत.
