पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मुंबई : पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुजोर खासदार संजय दिना पाटील यांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषदेने तीव्र शब्दांत निषेध केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिलेल्या धमकीची दखल घेऊन संजय दिना पाटील यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी एस. एम. देशमुख यांनी केली आहे.
संजय दिना पाटील यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. सुरक्षा व्यवस्थेवरील पोलिसांसमोर त्यांनी ही धमकी दिली आहे, हे अधिक गंभीर असून त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घ्यावी, अशी मागणीही एस. एम. देशमुख यांनी केली आहे.
संजय दिना पाटील आणि अन्य पाच खासदारांनी शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यासंदर्भातील त्यांची भूमिका आणि मते जनतेपर्यंत पोहोचविणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे.
त्यासाठीच पत्रकार संजय दिना पाटील यांच्या घरी गेले होते. तेथे काही अडचणीचे प्रश्न विचारल्यानंतर संजय दिना पाटील भडकले आणि त्यांनी पत्रकारांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
“परत आलात तर मारून टाकीन”, “घरासमोर उभे करतोय…”, “xxx मध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नका”, “माझी तक्रार कोणाकडे करायची ती करा”, अशी अर्वाच्च आणि अरेरावीची भाषा संजय दिना पाटील यांनी वापरली.
खासदाराला न शोभणारी ही भाषा संतापजनक असून, याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करीत आहोत, असे मत देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे.
“माझ्याकडे बॉम्ब आहे. माझ्याकडे निदर्शने करायला कोणी आलं तर बॉम्ब टाकीन”, तसेच “मी पाच खून केलेले आहेत”, अशी भाषा शिवसेनेला उद्देशून संजय दिना पाटील यांनी यापूर्वीही वापरली आहे.
एक खासदार “माझ्याकडे बॉम्ब आहे” अशी उघड धमकी देत असेल, तर ते अत्यंत गंभीर आहे. संजय दिना पाटील यांच्याकडे खरोखरच बॉम्ब आहे का? असेल तर तो कोठून आला? याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही एस. एम. देशमुख यांनी केली आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, डिजिटल मीडिया परिषदेचे अनिल वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
