आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बांधकाम ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 26, 2026
Spread the love

पुणे : ठरल्याप्रमाणे स्लॅब टाकूनही त्याखालील लोखंडी प्लेट व लाकडी बांबू काढण्यास मज्जाव करत, त्याच मोबदल्यात अतिरिक्त कामे करण्यासाठी दबाव टाकणे तसेच काम मिळू देणार नाही आणि पोलिसांकडे तक्रार करीन, अशी धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरून एका बांधकाम ठेकेदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यावरून उत्तमनगर पोलिसांनी बंगला मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ज्ञानोबा श्रीहरी वांजळे (वय ५४, रा. शिवांजली अपार्टमेंट, सरडेबाग, उत्तमनगर) असे आत्महत्या केलेल्या बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे पुत्र श्रीरंग ज्ञानोबा वांजळे (वय २१) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संतोष उभे (रा. कोंढूर, ता. मुळशी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मे २०२६ ते १८ जून २०२६ या कालावधीत मुळशी तालुक्यातील कोंढूर आणि हवेली तालुक्यातील मोकरवाडी (अहिरेगाव) येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानोबा वांजळे हे बांधकाम ठेकेदार होते. त्यांनी संतोष उभे यांच्या बंगल्याचा स्लॅब टाकण्याचे काम दीड लाख रुपयांत स्वीकारले होते. यासाठी त्यांनी लोखंडी प्लेट व लाकडी बांबू भाड्याने आणले होते. स्लॅब टाकून झाल्यानंतर काही दिवसांनी हे साहित्य काढून घेणे अपेक्षित होते. मात्र, संतोष उभे यांनी ते काढण्यास परवानगी दिली नाही.

तसेच, ठरलेल्या कामाव्यतिरिक्त इतर कामेही त्याच रकमेत करून देण्याचा आग्रह धरत वांजळे यांच्यावर दबाव टाकण्यात आला. परवडत नसलेली अतिरिक्त कामे करण्यास भाग पाडले. “तुला बघून घेतो, यापुढे कुठेच काम मिळू देणार नाही, तुझ्याविरोधात पोलिसांत तक्रार करीन,” अशा धमक्या देत त्यांना मानसिक त्रास दिला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

एकीकडे अतिरिक्त कामाचा तगादा, तर दुसरीकडे ती कामे पूर्ण केल्याशिवाय लोखंडी प्लेट व लाकडी बांबू काढू न देण्याचा अडथळा यामुळे वांजळे यांच्यावर भाड्याचा आर्थिक बोजा वाढत गेला. जवळपास महिनाभर साहित्य अडकून राहिल्याने त्याचे भाडेही वाढले. या आर्थिक व मानसिक तणावाला कंटाळून ज्ञानोबा वांजळे यांनी १८ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील करीत आहेत.