निलेश घायवळ टोळीतील सराईत गुंड अटकेत
कोथरूड पोलिसांची कारवाई : वर्षभरापासून फरार असलेला आरोपी कोथरूडमध्येच जेरबंद
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या गँगस्टर निलेश घायवळच्या टोळीतील सराईत गुंडाला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.
नीलेश उर्फ चांग्या हरिशंकर शर्मा (वय ३८, रा. गुजरात कॉलनी, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शर्मा याच्याविरुद्ध कोथरूड तसेच जामखेड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कोथरूड गोळीबार प्रकरणात निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली होती.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी निलेश घायवळ हा सध्या परदेशात असून, त्याला फरार घोषित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे घायवळ टोळीतील सराईत गुंड शर्मा हाही गेल्या वर्षभरापासून फरार होता. त्याचा पोलीसांकडून सातत्याने शोध सुरू होता.
दरम्यान, शर्मा हा सुतार दवाखान्याजवळील मंडई परिसरात थांबल्याची माहिती तपास पथकातील पोलीस अंमलदार विष्णू राठोड, आकाश वाल्मिकी आणि वैभव शितकाल यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर कोथरूड पोलीस ठाण्यातील गेल्या वर्षी दाखल झालेल्या मकोका गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त सागर कवडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक अनिल माने, सुनील कारोटे, पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण तसेच पोलीस अंमलदार विष्णू राठोड, आकाश वाल्मिकी, वैभव शितकाल, मंगेश शेळके, मयूर पांढरे, श्रीकांत दगडे आणि दत्ता सोनवणे यांनी केली.
