जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट ई-मेल
महसूल मंत्र्यांच्या कार्यालयाचा संदर्भ देऊन जमीन नोंद बदलण्याचा प्रयत्न : बारामतीत गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : महसूल मंत्र्यांच्या ई-ऑफिसच्या संदर्भ क्रमांकाचा उल्लेख करून जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट ई-मेल पाठवून जमीन नोंदी बदलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामध्ये जमिनीची नोंद बदलण्यास सांगून वहिवाटीच्या हद्दीची पाहणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.
याबाबत महसूल नायब तहसीलदार स्वाती सुभाष गायकवाड (वय ५२, रा. बारामती) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती गायकवाड या बारामती तहसील कार्यालयात कार्यरत असून, त्या तहसील कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या शासकीय ई-मेल व पत्रव्यवहाराचे कामकाज पाहतात.
२१ एप्रिल २०२६ रोजी दुपारी तहसील कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर mahsulpune2@protonmail.com या ई-मेल आयडीवरून एक ई-मेल प्राप्त झाला.
त्या पत्रावर जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे (महसूल शाखा), बी विंग, दुसरा मजला, पुणे स्टेशन, पुणे – ४११००१ असा उल्लेख करण्यात आला होता. तसेच पे. या. पदनूर, तहसीलदार, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे असे नाव, पदनाम व सही नमूद करण्यात आली होती.
या पत्रामध्ये मौजे म्हसोबाची वाडी, ता. बारामती येथील गट क्रमांक १ मधील २० आर क्षेत्राबाबत श्री. गोविंद बाबासो कोकरे यांच्या नावाची नोंद घेऊन प्रत्यक्ष वहिवाटीच्या हद्दीची पाहणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच पत्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री यांच्या कथित ई-ऑफिस संदर्भ क्रमांकाचाही उल्लेख करण्यात आला होता.
हा ई-मेल व पत्र संशयास्पद वाटल्याने बारामतीचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी त्याची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान त्यांनी तहसीलदार (महसूल) उमाकांत कडनोर यांच्याशी संपर्क साधून खात्री केली.
त्यामध्ये संबंधित ई-मेल आयडी हा जिल्हाधिकारी कार्यालयाचा अधिकृत ई-मेल आयडी नसल्याचे समोर आले. तसेच पत्रावर नमूद करण्यात आलेल्या पे. या. पदनूर नावाचे कोणतेही अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत नसल्याचे निष्पन्न झाले. हे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयातून पाठविण्यात आले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
बनावट ई-मेल पाठवून शासकीय कार्यालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले असून, पोलीस हवालदार गोरे पुढील तपास करीत आहेत.
बनावट कागदपत्रे तयार करणारी संघटित टोळी
बारामतीप्रमाणेच केसनंद येथील जमिनीबाबत लोणी काळभोरच्या तहसीलदारांच्या नावाने बनावट पत्र केसनंद महसूल विभागाला पाठविण्यात आले होते. याप्रकरणी तहसीलदार तृप्ती कोलते यांनी १५ दिवसांपूर्वी दिलेल्या फिर्यादीवरून वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीत तहसीलदार तृप्ती कोलते यांनी अशा प्रकारे बनावट कागदपत्रे तयार करणारी संघटित टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला होता. भूमिअभिलेख विभागातील अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट मोजणी आदेश, पीएमआरडीएच्या आदेशांमध्ये फेरफार तसेच निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या डिजिटल स्वाक्षरीचाही गैरवापर करण्यात आल्याचे समोर आले आहे.
