आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पालखी मार्ग अनधिकृत होर्डिंग्जमुक्त

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 27, 2026
Spread the love

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पालखी मार्गावरील अनधिकृत होर्डिंग्जविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे. वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि निर्विघ्न व्हावा, या उद्देशाने पालखी मार्गावरील तब्बल ७० अनधिकृत होर्डिंग्ज हटवून मार्ग अनधिकृत जाहिरातींपासून मुक्त करण्यात आला आहे.

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी मे महिन्यातच पालखी मार्गांवरील होर्डिंग्जचे सर्वेक्षण करून अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार अनधिकृत बांधकाम विभागाने हवेली, दौंड आणि पुरंदर तालुक्यांतील पालखी मार्गावरील सुमारे १२३ होर्डिंग्जचे सविस्तर सर्वेक्षण केले.

या सर्वेक्षणात कायदेशीर परवानगीशिवाय उभारण्यात आलेली तब्बल ७० होर्डिंग्ज आढळून आली. त्यापैकी हवेली-सोलापूर मार्गावरील ३२, दौंड तालुक्यातील १३, पुरंदर तालुक्यातील १३ आणि वडकी परिसरातील १२ अशा एकूण ७० अनधिकृत होर्डिंग्जवर प्रशासनाने थेट कारवाई करून ती हटविली.

काही होर्डिंगधारकांनी प्रशासनाच्या सूचनेनंतर स्वतःहूनही आपली होर्डिंग्ज काढून घेतल्याची माहिती अनधिकृत बांधकाम विभागाचे सहआयुक्त हिंमत खराडे यांनी दिली.

केवळ पालखी मार्गांपुरतीच ही मोहीम मर्यादित नसून, पीएमआरडीएच्या हद्दीतील पुणे जिल्ह्यातील इतर प्रमुख रस्ते आणि मोक्याच्या ठिकाणांवरील होर्डिंग्जचे सर्वेक्षणही वेगाने सुरू आहे.

या पाहणीत विनापरवाना अथवा नियमबाह्य होर्डिंग्ज आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे हिंमत खराडे यांनी स्पष्ट केले

यासंदर्भात महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, “पीएमआरडीएच्या हद्दीत कुठेही होर्डिंग्ज उभारताना प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे.

नियमबाह्य आणि विनापरवाना उभारलेल्या होर्डिंग्जवर कोणतीही गय केली जाणार नाही आणि त्यांच्यावर थेट निष्कासनाची कारवाई करण्यात येईल.”