आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सोलापूर महामार्गावर केमिकलचा टँकर उलटला

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 27, 2026
Spread the love

पुणे : सोलापूर–पुणे महामार्गावर केमिकलचा टँकर झाडाला धडकून उलटल्याची घटना शनिवारी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातानंतर केमिकलची गळती सुरू झाली होती. पीएमआरडीएच्या वाघोली अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने उलटलेला टँकर सरळ उभा केल्याने मोठा अनर्थ टळला. ही कारवाई सकाळी ६ ते १०.४० वाजेपर्यंत सुरू होती.

सोलापूर–पुणे महामार्गावरील उरुळी कांचनजवळील सहजपूरवाडी येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात एक केमिकल टँकर पलटी झाल्याची माहिती वाघोली कंट्रोल रूमला मिळाली.

त्यानंतर वाघोली अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान टँकरमध्ये वैद्यकीय क्षेत्रात आणि रासायनिक खतांमध्ये वापरण्यात येणारे डायसोप्रोपिलामाइन (Diisopropylamine) हे रसायन असल्याची माहिती वाहनमालकाने दिली.

टँकरमधून मोठ्या प्रमाणात गळती होत नव्हती. मात्र, टँकर उलटल्यानंतर ज्या ठिकाणाहून तो भरला जातो, त्या भागावरील तीन झाकणांमधून केमिकलची हळूहळू गळती सुरू झाली होती. त्यामुळे परिसरात घबराट पसरली होती.

अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वप्रथम टँकर ज्या झाडाला धडकला होता ते झाड बाजूला केले. त्यानंतर तीन हायड्रा क्रेन आणि एका जेसीबी मशीनच्या साहाय्याने टँकर हळूहळू सरळ उभा करण्यात आला. ही संपूर्ण कारवाई जवळपास चार तास सुरू होती.