भीमराव कांबळे याला तीनदा फाशी
नसरापूर अत्याचार प्रकरणात पोक्सोसह खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयाने सुनावली फाशीची शिक्षा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी पोक्सोसह खुनाच्या गुन्ह्यात तीन वेगवेगळ्या कलमांखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने १६७ पानी निकालपत्र दिले आहे.
आरोपीने केलेले कृत्य हे अतिशय घृणास्पद आणि निर्घृण असून तो कोणतीही दयामाया दाखविण्यास पात्र नसल्याचे नमूद करत न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितले की, भीमराव कांबळे याला कलम ६५ (२) अंतर्गत लैंगिक अत्याचाराबद्दल फाशी, कलम १०३ (२) अन्वये फाशी तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अंतर्गत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच कलम ७४ (विनयभंग) अंतर्गत ५ वर्षे सक्तमजुरी, कलम १३७ (२) (अपहरण) अंतर्गत जन्मठेप, कलम १४० (१) (अपहरण) अंतर्गत जन्मठेप, तसेच पोक्सो कलम ८ अंतर्गत ५ वर्षे सक्तमजुरी आणि कलम १२ अंतर्गत ३ वर्षे सक्तमजुरी अशा वेगवेगळ्या शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत.
हा संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होता. त्यामध्ये पोलिसांनी १२०० पानी दोषारोपपत्र सादर केले होते. आरोपीने अतिशय थंड डोक्याने आणि नियोजनपूर्वक हा गुन्हा केला होता. सर्व पुरावे आरोपीच्या विरोधात होते. आरोपीच्या बाजूने केवळ त्याचे वय हा एकच मुद्दा होता. मात्र, त्याबाबतही बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळताना न्यायालयाने नमूद केले की, वयाच्या ६५ व्या वर्षीदेखील त्याच्या वासनेची भूक संपलेली नाही. त्यामुळे असा माणूस समाजासाठी घातक ठरू शकतो.
अशा घटना समाज व न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने घातक
ही घटना आणि त्यानंतर समाजातून निर्माण झालेला उद्रेक हा समाज व न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने धक्कादायक असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. समाजमन खवळून उठले होते आणि “आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्हीच त्याचा न्याय करू,” अशी भावना व्यक्त करण्यात आली. अशी प्रवृत्ती समाज आणि न्यायव्यवस्थेसाठी घातक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
तपास पथकाचे अभिनंदन
न्यायालयाने पोलिसांनी केलेल्या तपासाबाबतही गौरवोद्गार काढले आहेत. न्यायवैद्यकीय पुरावे सादर करताना कोणताही शॉर्टकट न घेता सर्व साक्षीपुरावे ‘ई-साक्ष’ ॲपवर नोंदवून अपलोड करण्यात आले. त्यामुळे मानवी हस्तक्षेपाला कोणतीही जागा राहिली नाही. तसेच एकही तारीख न घेता सलग कामकाज पार पडले. साक्षीदारांनी रांगा लावून साक्ष दिल्याबद्दल न्यायालयाने त्यांचेही अभिनंदन केले. एकाच दिवशी १० साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. अवघ्या १६ दिवसांत ५५ साक्षींची नोंद करून न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी मोठे सहकार्य केल्याचे न्यायाधीश साळुंके यांनी नमूद केले.
याबाबत पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले की, न्यायालयाने कोणतीही सुट्टी न घेता सलग १६ दिवस सुनावणी घेतली. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत त्यांनी केवळ या खटल्यावर लक्ष केंद्रित केले. विशेष सरकारी वकील अजय मिसर व त्यांचे सहकारी रात्री उशिरापर्यंत थांबून दररोज खटल्याची तयारी करत होते.
या घटनेनंतर विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. प्रत्येकाला आपले काम स्पष्टपणे सोपविण्यात आले होते. त्यानुसार लेखनिक व अंमलदार यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन सर्व साक्षीपुरावे वेळेत पूर्ण केले.
तपास पथकाने पीडित मुलगी ही स्वतःचीच मुलगी असल्याची भावना ठेवून तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
आईच्या नजरेतून तपास
तपास अधिकारी विजयमाला पवार यांनी सांगितले की, या घटनेचा पंचनामा करताना मला माहीत नव्हते की, या प्रकरणाचा तपास माझ्याकडे येणार आहे. आपल्या बाळाला थोडेसे जरी लागले तरी आईच्या हृदयाला वेदना होतात. या बाळाला झालेल्या जखमा पाहून तिने त्या वेळी किती यातना सहन केल्या असतील, याची कल्पनाही करवत नाही. आम्ही पोलीस असलो तरी याच समाजाचे घटक आहोत. या समाजातून अशा विकृती पुढे आल्या आहेत. आम्ही आमच्या परीने त्या बाळाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
तपासातील दिरंगाईमुळे दोनदा निर्दोष
नराधम भीमराव कांबळे याने यापूर्वीही अशाच प्रकारे दोनदा अत्याचार केल्याचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितले. तो ३९ वर्षांचा असताना त्याने ६५ वर्षांच्या महिलेवर अत्याचार केला होता. १९९९ साली झालेल्या त्या गुन्ह्याचा खटला २००९ मध्ये सुरू झाला आणि त्याच्या सुनावणीस तब्बल १० वर्षे लागली. तसेच २०१७ मधील दुसरा खटला २०१९ मध्ये सुरू झाला.
विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना ॲड. प्रथमेश शिंगवे, ॲड. सुरेश गायकवाड, ॲड. मंगेश नवले आणि ॲड. राधिका नावंदर-जोशी यांनी सहकार्य केले.
पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली देखरेख अधिकारी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस उपअधीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा) राजेंद्र मायणे यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक विजयमाला पवार (तपास अधिकारी), स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, राजगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, शिरूर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे, सहाय्यक पोलीस फौजदार शंकर नवले, पोलीस हवालदार नाना मदने (राजगड पोलीस ठाणे), गणेश धनवे (स्थानिक गुन्हे शाखा), ए. आर. चमनशेख (मुख्यालय), पोलीस अंमलदार अक्षय नलावडे (राजगड पोलीस ठाणे), पोलीस हवालदार एम. एस. भगत (स्थानिक गुन्हे शाखा), संदीप सपकाळ, संतोष भापकर, भारत मोहोळ, श्रीधर जगदाळे, मंगेश काळे, सौरभ थोरात, अमोल शेडगे, मंगेश थिगळे, अतुल फरांदे, खंडू निश्चित, मंगेश कुंभार, संजय शेडगे, नितीन रावते, मयूर निंबाळकर, राहुल भडाळे, समीर भोळराव, गणेश लडकत, सायबा बाबर आणि शिवम कुंभार यांनी तपास केला.
