आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 30, 2026
Spread the love

पुणे : रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोकड व मोबाईल लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या टोळीतील एका आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे.

राहुल सिताराम निकम (वय २८, रा. लक्ष्मी पार्क, तरवड वस्ती, महंमदवाडी, कोंढवा) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १ लाख ३० हजार रुपयांचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

कात्रज-कोंढवा रोडवरील माऊलीनगर येथील महानतेश दानप्पा डोमनाळ हे २४ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दूध आणण्यासाठी पायी जात होते.

त्यावेळी चोरट्यांनी त्यांना अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली आणि त्यांचा मोबाईल फोन हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मोबाईल चोरट्यांचा तांत्रिक विश्लेषण व बातमीदारामार्फत शोध घेत असताना हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी उमर शेख, साहील शेख आणि राहुल निकम यांनी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार आरोपींचा शोध घेत असताना राहुल निकम हा वंडर सिटी रोडवर थांबला असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.

त्यावरून पोलिसांनी राहुल निकम याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्याद्वारे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नीलेश मोकाशी, तसेच पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सोहम शेंडकर, सचिन सरपाले, अवधूत जमदाडे, महेश बारवकर, मंगेश पवार, नीलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार आणि संदीप आगळे यांनी केली.