पोलीस उपनिरीक्षक बेशिस्त वर्तनामुळे निलंबित
कॅफेतील खाद्यपदार्थ, कॉफीचे ग्लास काठीने फोडले : डेक्कनवरील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : डेक्कन पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला रात्रपाळीच्या कर्तव्यावर असताना शिरोळे रोडवरील कॅफेमध्ये केलेले बेशिस्त आणि गैरवर्तन चांगलेच भोवले आहे. संदीप कदम असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, त्यांना पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी दिले आहेत.
कदम हे ६ जून रोजी रात्रपाळीच्या कर्तव्यावर होते. रात्री पावणे दोनच्या सुमारास आस्थापना बंद करत असताना ते शिरोळे रोडवरील ‘फ्लाइंग जिप्सी’ नावाच्या कॅफेमध्ये आले.
त्यांनी आपल्या हातातील काठीने काउंटरवरील कॉफीचे ग्लास व इतर खाद्यपदार्थ फोडून खाली पाडले. तसेच कॅफेत बसलेल्या ग्राहकांना त्यांच्या टेबलांवरून उठून जाण्यास सांगितले. कॅफेतील कर्मचाऱ्यांशी अरेरावीची भाषा केली.
दरम्यान, हा सर्व प्रकार कॅफेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे शिस्तप्रिय पोलीस खात्याची प्रतिमा जनमानसात मलीन झाली.
कदम यांनी केलेले कृत्य बेजबाबदारपणाचे असून, पोलीस खात्यास अशोभनीय व खात्याच्या शिस्तीस बाधा निर्माण करणारे असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, शहरातील स्थायी व अस्थायी आस्थापना, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार आणि पब यांच्या संदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली जारी केली आहे.
प्रत्येक आस्थापनेसाठी निर्धारित वेळेची मर्यादा आखून देण्यात आली असून, त्यांनी कोणकोणती खबरदारी घ्यायची याबाबत सूचना दिल्या आहेत.
तसेच रात्री या आस्थापना बंद करताना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. एखादी आस्थापना नियमांचे उल्लंघन करत असल्यास, अपवादात्मक परिस्थिती वगळता पोलीस अधिकारी आतमध्ये प्रवेश करणार नाहीत.
ते व्यवस्थापकाला बाहेर बोलावून संबंधित आस्थापनेवर कारवाई करतील. असे असतानाही पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी कॅफेमध्ये प्रवेश करून ग्राहकांसमोरच काठीने काउंटरवरील खाद्यपदार्थ खाली पाडले.
ग्राहकांना बाहेर हाकलून लावले. हा प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
एपीआयला मारहाण करणारा पोलीस हवालदार निलंबित :- एखाद्या गुंडाच्या तोंडीदेखील शोभणार नाही अशी भाषा एका पोलीस हवालदाराने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वापरली. एका सहायक पोलीस निरीक्षकाला अश्लील शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. विवेक रमेश बसनगार या हवालदाराला पोलीस उपायुक्त चिलुमुलु रजनिकांत यांनी निलंबित केले आहे. हवालदार बसनगार हे चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. या हवालदाराने अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांच्याशी बेजबाबदार, असभ्य व अरेरावीचे, जातीवाचक तसेच अश्लील शब्द वापरून जाणीवपूर्वक अपमान केला. १० मार्च रोजी याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कसुरी अहवाल पाठवला. त्यामध्ये या हवालदाराला ५ हजार रुपयांच्या आर्थिक दंडाची शिक्षा देण्यात आली. त्या शिक्षेचा राग मनात धरून २६ जून रोजी या हवालदाराने खडकी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलून त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी, २७ जून रोजी हे हवालदार तपास पथकातील एपीआय यांच्या केबिनमध्ये आले. त्यांनी मोबाईल काढून चित्रीकरण करत, “तुम्ही माझी स्टेशन डायरी का केली? त्यामुळे मला शिक्षा झाली,” असे बोलून धमकावले. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील त्यांनी एपीआय यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि त्यांच्या अंगावर धावून गेले. याबाबत संबंधित एपीआय यांनी स्टेशन डायरीला नोंद केली. २९ जून रोजी हे एपीआय पोलीस ठाण्यात आले असता, या हवालदाराने त्याच्याकडील दुचाकी धोकादायकरित्या चालवून एपीआयला शिवीगाळ केली व मारहाण केली. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश करून, “माझ्यावर अन्याय झाला आहे. मला न्याय द्या,” असे मोठ्याने ओरडत आरडाओरडा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त चिलुमुलु रजनिकांत हे चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आले. त्यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊन संबंधित हवालदाराला निलंबित केले.
विवेक भाई बात कर रहा है :- एपीआयला मारहाण करणाऱ्या या हवालदाराच्या तीन ते चार ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. एखाद्या गुंडाच्या तोंडीदेखील शोभणार नाही अशी भाषा हे हवालदार बोलत असल्याचे त्या क्लिपमध्ये ऐकू येते. “विवेक भाई बात कर रहा है,” असे म्हणत शिव्यांची लाखोली वाहणे, “काठ्या, कुऱ्हाडी बाहेर काढा,” अशी धमकी देणे, तसेच एका व्यक्तीला फोन करून संबंधित एपीआयच्या सोलापूर येथील नातेवाईकांची कुंडली काढण्यास सांगणे, असेही या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत असल्याचे समोर आले आहे.
