आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

घरफोड्या करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 1, 2026
Spread the love

पुणे : कोथरूडमधील सोसायटीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून, काढलेल्या डम्प डेटाचे तांत्रिक विश्लेषण आणि फिंगरप्रिंट विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, सांगली व गुजरात येथील ८ घरफोडी व १ वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

धनंजय हरीश काळे (वय २१, रा. सृष्टी चौक, पिंपळे गुरव), यश ऊर्फ गट्या दत्ता देशमुख (वय १९, रा. आदर्श हॉटेलजवळ, भारतनगर, पिंपरी) आणि मोहन नागनाथ नवले (वय ३९, रा. भारतनगर झोपडपट्टी, पिंपरी रेल्वे स्टेशन शेजारी, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अर्चना उमेश वाडेकर (रा. काशी कापडी पुरम, कोथरूड) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अर्चना वाडेकर या २३ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता नातीला शाळेतून घेऊन येण्यासाठी घराला कुलूप लावून शाळेत गेल्या होत्या.

दुपारी २ वाजता त्या नातीला घेऊन घरी आल्या. या दरम्यान चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातील १३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व २७० ग्रॅम चांदीचे दागिने, असा १० लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज, तसेच समोर राहणारे राजेंद्र पालकर यांच्या घरातून १० हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती.

या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातील एकूण २०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.

तसेच पोलीस अंमलदार महेश पाटील यांनी घटनास्थळ व आजूबाजूचा काढलेला डम्प डेटा याचे तांत्रिक विश्लेषण केले. तसेच फिंगरप्रिंट विभागातील सहायक पोलीस निरीक्षक नाथा भुजबळ यांनी आरोपीच्या फिंगरप्रिंटबाबत माहिती दिल्याने गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झाले.

त्यानंतर ३० जून रोजी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार साई करके व महेश पाटील यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी पुण्यातून गोव्याला जाणार असून सध्या ते रेंज हिल्स परिसरात थांबले आहेत.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात शोध घेऊन धनंजय काळे, यश देशमुख आणि एका अल्पवयीन साथीदाराला पकडले. त्यांनी कोथरूड व इतर ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली.

घरफोडीत चोरलेले दागिने व इतर वस्तू मोहन नवले व मतीन कुरेशी (रा. काळेवाडी) यांच्या मार्फत विकल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मोहन नवले याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून ११ लाख ११ हजार रुपयांची रोकड, मोबाईल, मोटारसायकल, सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या चोरट्यांनी कोथरूडमधील २ घरफोड्या, बिबवेवाडी, सहकारनगर व दिघी येथील प्रत्येकी १ घरफोडी, तसेच सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३ घरफोड्या आणि गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील वापी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ घरफोडी, असे एकूण ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. अधिक तपासासाठी त्यांना कोथरूड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके व पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे तसेच पोलीस अंमलदार साई करके, महेश पाटील, साधना पवार, अमित गद्रे, बाळू गायकवाड, रवींद्र लोखंडे, अजित शिंदे, प्रदीप राठोड, गणेश ढगे आणि शिवाजी सातपुते यांनी केली.