आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 1, 2026
Spread the love

पुणे : चार वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याने कोयत्याने तरुणावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. लोणीकंद पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

गणेश धोंडीराम सुनुपे (वय २५, रा. माने वस्ती, पेरणे फाट्याजवळ, वढू खुर्द) असे जखमी झालेल्याचे नाव असून, सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत शंभू धोंडीराम सुनुपे (वय २१, रा. वढू खुर्द) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रदीप चंद्रकांत माने (वय २४, रा. तापकीर वस्ती, पेरणे फाटा) आणि ध्रुव रवि शर्मा (वय २३, रा. युनिकॉन निवास सोसायटी, पेरणे) यांना अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंभू सुनुपे व प्रदीप माने यांच्यामध्ये चार वर्षांपूर्वी किरकोळ भांडण झाले होते. त्यावेळी प्रदीप माने याने शंभू यांना मारहाण केली होती.

गणेश हा त्याबाबत जाब विचारण्यासाठी गेला असता, त्यालाही मारहाण करण्यात आली होती. त्याच वेळी दोन्ही भावांना संपवण्याची धमकीही देण्यात आली होती.

२९ जून रोजी रात्री १० वाजता जेवण झाल्यानंतर गणेश हा अक्षय बिअर शॉपीजवळ असलेल्या अविश्री डेअरी फार्म येथे गेला होता. त्यावेळी प्रदीप माने व त्याचे दोन साथीदार तेथे कोल्ड्रिंक पीत होते.

त्यावेळी प्रदीप माने याने गणेश याला, “तू मला दारू पाज,” असे सांगितले. त्यावर गणेश याने, “मी दारू पित नाही,” असे उत्तर दिले. यानंतर प्रदीप माने याने दुकानातून कोल्ड्रिंकच्या तीन बाटल्या व चकल्या आणून दिल्या.

गणेश कोल्ड्रिंक घेत असताना प्रदीप माने व त्याच्या दोन साथीदारांनी माने यांच्या कारमधून तीन कोयते काढले. त्यांनी गणेश याला शिवीगाळ करत, “तुला आता जिवंत सोडणार नाही,” असे म्हणत त्याच्या डोक्यावर, डाव्या हाताच्या मनगटावर, पायावर व पाठीवर अशा ठिकठिकाणी कोयत्याने वार करून त्याला रक्तबंबाळ केले.

घटनास्थळी लोकांची गर्दी जमू लागल्याने तिघेही आरोपी तेथून पळून गेले. हा प्रकार शंभू यांना समजल्यानंतर त्यांनी गणेश याला रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

पोलिसांनी प्रदीप माने व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक कदम पुढील तपास करीत आहेत.