लायनेस्टिक वर्षाची सुरुवात १२० विद्यार्थ्यांना लेखन पॅड वाटपाने
लिओ लायन्स क्लब बार्शी टाउन यूथचा वाकडी येथे शैक्षणिक सेवा उपक्रम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : लिओ लायन्स क्लब बार्शी टाउन यूथ यांच्या वतीने लायनेस्टिक वर्ष २०२६–२७ ची सुरुवात एका अर्थपूर्ण आणि समाजोपयोगी सेवा उपक्रमाने करण्यात आली. क्लबतर्फे राजे श्री शिवछत्रपती विद्यालय, वाकडी (ता. परंडा, जि. धाराशिव) येथे इयत्ता ७ वी ते १० वीतील १२० विद्यार्थ्यांना मोफत लेखन पॅडचे वाटप करण्यात आले.
क्लबच्या नावातील “यूथ” या संकल्पनेला साजेसा युवक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार सदस्यांनी व्यक्त केला आहे.
युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना दृढ व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी, या उद्देशाने लायनेस्टिक वर्षातील पहिलाच सेवा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला.
शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याची भावना जपत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करणे आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमात क्लबच्या पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लेखन पॅडचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर शिक्षकांनीही क्लबच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत भविष्यातही अशाच सेवाभावी उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबचे अध्यक्ष शुभम (पवन) श्रीश्रीमाळ, सचिव उदयन सावंत, खजिनदार गौरव सुराणा, सर्व्हिस चेअरपर्सन अनिश श्रीश्रीमाळ, उपाध्यक्ष यश कुंकुलोळ, माजी लिओ अध्यक्ष सीए तेजस रायचूरकर, संचालक यश मेहता, रोनक कुंकुलोळ तसेच सीए श्रेणीक गुंदेचा यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास विद्यालयाच्या संस्थेच्या सचिवा पुष्पांजली पाटील, मुख्याध्यापक सुधाकर जाधव, शिक्षक नितीन पाटील, सुरेश ठाकरे, प्रमोद कांबळे, आप्पासाहेब जगताप, निसर्ग पाटील तसेच इतर शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष शुभम श्रीश्रीमाळ यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, नियमित अभ्यासाचे मूल्य तसेच सामाजिक सेवाभाव याविषयी मार्गदर्शन केले.
लायन्स क्लब इंटरनॅशनल ही जगातील सर्वात मोठ्या सेवाभावी संस्थांपैकी एक असून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, रक्तदान, आपत्ती निवारण आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे मानवसेवेचे कार्य सातत्याने करत असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजासाठी कार्य करताना युवकांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीवही ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. यापुढेही शैक्षणिक कार्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या हिताच्या कोणत्याही उपक्रमासाठी सहकार्याची आवश्यकता भासल्यास लिओ लायन्स क्लब बार्शी टाउन यूथ ही संस्था सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत विशेष परिश्रम घेतले. क्लबच्या या सेवाभावी उपक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी मनापासून स्वागत करून कौतुक केले.
