शुश्रूषा करणाऱ्या चार महिलांमधून चोर महिलेला अटक
वृद्ध महिलेच्या हातात बनावट बांगड्या घालून सोन्याच्या बांगड्या नेल्या होत्या चोरुन : विमानतळ पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ८० वर्षीय वृद्ध आईची काळजी घेण्यासाठी त्यांनी चार महिलांना कामावर ठेवले होते. सुरुवातीला आईच्या हातातील चार बांगड्यांपैकी एक बांगडी चोरीला गेली. काही दिवसांनी आईच्या हातातील उर्वरित तीन सोन्याच्या बांगड्या वेगळ्या असल्याचा संशय आला. खात्री केल्यावर त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. विमानतळ पोलिसांनी आईची शुश्रूषा करणाऱ्या चार महिलांमधून चोरी करणाऱ्या महिलेला शोधून काढले. तिला अटक करून सोन्याच्या बांगड्या, चांदीचे ग्लास, निरंजन असा सुमारे ७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
अनिता रामचंद्र सुतार (वय ४५, रा. मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अजय राजकुमार कनोत्रा (वय ५९, रा. कोनार्क कॅम्पस, विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय कनोत्रा हे आपल्या आईसोबत राहतात. आईच्या देखभालीसाठी त्यांनी घरात चार महिला कामावर ठेवल्या होत्या. आई वयोवृद्ध असल्याने तिची काळजी घेण्यासाठी अनिता ही रात्री घरीच राहत होती.
२१ मे रोजी अनिताने त्यांना सांगितले की, आईच्या हातातील चार बांगड्यांपैकी एक बांगडी दिसत नाही. त्यावेळी त्यांनी घरात बांगडी शोधली, मात्र ती मिळाली नाही. त्यावेळी त्यांनी आईच्या हातातील उर्वरित तीन सोन्याच्या बांगड्यांचे फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवले होते.
त्यानंतर ते कामानिमित्त गुवाहाटी येथे गेले होते. तेथून ७ जून रोजी परत आल्यानंतर १० जून रोजी अनिताने गावी सोलापूर येथे देवीची पूजा असल्याचे सांगून सुट्टी घेतली.
१५ जून रोजी ते आईच्या शेजारी बसले असताना त्यांचे लक्ष तिच्या हाताकडे गेले. त्यावेळी आईच्या हातातील सोन्याच्या बांगड्या वेगळ्या असल्याचे त्यांना दिसले.
मोबाईलमधील फोटो आणि हातातील बांगड्या यांची तुलना केल्यावर कोणीतरी आईच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून त्यांच्या जागी बनावट बांगड्या घातल्याचे उघड झाले.
याप्रकरणी ५ लाख ९५ हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात दिली. विमानतळ पोलिसांसमोर प्रश्न होता की, आईची शुश्रूषा करण्यासाठी चार महिला होत्या.
त्यापैकी नेमकी चोरी कोणी केली? पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांनी घरकाम करणाऱ्या सर्व महिलांची चौकशी केली. त्यावेळी अनिता सुतार ही या कालावधीत गावाला गेल्याचे समोर आले.
त्यामुळे पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिनेच प्रथम आईच्या हातातील एक सोन्याची बांगडी चोरली होती.
त्याच बांगडीच्या नमुन्याप्रमाणे बनावट बांगड्या तयार करून त्या आईच्या हातात घातल्या आणि खऱ्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. चोरी केलेल्या बांगड्या तिने सोलापूरमधील एका सराफाला विकल्या होत्या.
पोलिसांनी तिच्याकडून सोन्याच्या बांगड्यांसह घरातील चांदीचे ग्लास, निरंजन असा एकूण ७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांतीलाल गुंड करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक महेश बोलके यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, कांतीलाल गुंड, पोलीस अंमलदार प्रियंका काळे, अंबादास चव्हाण, राहुल जोशी, सचिन मांजरे, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, हरीप्रसाद पुंडे, प्रशांत सुतार, लालू कऱ्हे, अंकुश जोगदंड, दिगंबर गोरे, राजीव टोम्पे, सना शेख आणि आशा धादवड यांनी केली.
