गोळीबार करणारे बाळासाहेब चांदेरे पोलिसांच्या ताब्यात
जमिनीच्या वादातून मध्यरात्रीचा प्रकार : बावधन पोलिसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : जमिनीच्या वादातून शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी गोळीबार करून दहशत निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. सूस-नांदेड रोड परिसरात मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास हा प्रकार घडला. बावधन पोलिसांनी बाळासाहेब चांदेरे आणि त्यांचा साथीदार संदेश माने यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडील पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षक नागेश राठोड यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब चांदेरे आणि लहु माळी यांच्यात सूस-नांदेड रोडवरील एका जमिनीच्या मालकीवरून वाद सुरू आहेत. संबंधित जागेवर लहु माळी यांनी दोन सुरक्षारक्षक नेमले आहेत. मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास बाळासाहेब चांदेरे आणि संदेश माने हे त्या ठिकाणी गेले. तेथे त्यांची सुरक्षारक्षकांशी वादावादी झाली. त्यानंतर कामगारांनी त्यांना धक्काबुक्की केली.
यावेळी बाळासाहेब चांदेरे यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल होते. धक्काबुक्की झाल्यानंतर त्यांनी ते पिस्तूल लोड करण्यास सुरुवात केली. हे पाहताच सुरक्षारक्षक तेथून पळून गेले. त्यानंतर चांदेरे यांनी जमिनीच्या दिशेने गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच बावधन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, बाळासाहेब चांदेरे आणि संदेश माने यांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख
बाळासाहेब चांदेरे हे पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. एप्रिल २०२३ मध्ये पक्षविरोधी कारवायांमुळे त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. सध्या ते शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असून, मुळशी पंचायत समितीचे माजी सभापतीही राहिले आहेत. भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघात ते सक्रिय आहेत.
