आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पोलिसांनीच ई सिगारेट, हुक्का फ्लेवर मागविला ऑनलाईन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 2, 2026
Spread the love

पुणे : ऑनलाईनद्वारे बेकायदेशीरपणे प्रतिबंधित ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरची विक्री होत असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती. मात्र, ही विक्री नेमकी कोण करत आहे, याची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी बनावट ग्राहक बनून ऑनलाईन ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरची ऑर्डर दिली. पोर्टरमार्फत डिलिव्हरीसाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मदवाडी येथील दुकानावर छापा टाकून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

असद चांदमिया बरभैया (वय ३१, रा. बैगदीनगर, कोंढवा) आणि विकास रमेश बागुल (वय ३३, रा. मोहम्मदवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन प्रतिबंधित ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरची विक्री होत असल्याची माहिती पोलीस अंमलदार हरीप्रसाद पुंडे यांना मिळाली होती.

ही प्रतिबंधित उत्पादने कोण विकत आहे तसेच त्यांचे गोदाम कोठे आहे, याची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे विमानतळ पोलिसांनी बनावट ग्राहक बनून ऑनलाईन हुक्का फ्लेवरची ऑर्डर दिली.

डिलिव्हरीसाठी विमाननगर येथील कोनार्क सोसायटीजवळील सीसीडी चौकाचा पत्ता देण्यात आला. त्यानुसार एक डिलिव्हरी बॉय १८ हजार ३२० रुपयांचे प्रतिबंधित हुक्का फ्लेवरचे पार्सल घेऊन सीसीडी चौकात आला. पोलिसांनी हे पार्सल ताब्यात घेतले.

त्यानंतर डिलिव्हरी बॉयकडे हे पार्सल कोठून आणले, याची चौकशी करण्यात आली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड आणि तपास पथकाने मोहम्मदवाडी येथील शिशा कॉर्नर या दुकानावर छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले.

तेथून प्रतिबंधित हुक्का फ्लेवर, ई-सिगारेट आणि संबंधित इतर साहित्य असा एकूण १ लाख ४२ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार, सहायक पोलीस आयुक्त सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक महेश बोलके यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार हरीप्रसाद पुंडे, लालू कऱ्हे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, दिगंबर गोरे, राजीव टोम्पे, प्रशांत सुतार, अंकुश जोगदंडे, आशा धादवड आणि सना शेख यांनी केली.