आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

‘सिंहगड’चे संस्थापक मारुती नवले यांच्यावर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 3, 2026
Spread the love

पुणे : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या २७ शिक्षकांना गेली सहा वर्षे पगार न देता तब्बल ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच पगार मागितल्यास कामावरून काढून टाकण्याची व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संस्थापक मारुती नवले व इतरांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत ४५ वर्षीय एका शिक्षिकेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले, सचिव सुनंदा मारुती नवले, उपाध्यक्ष रचना नवले ऊर्फ अष्टेकर, उपाध्यक्ष रोहित मारुती नवले, संस्थेचे इतर विश्वस्त, अकाऊंट विभागातील संजय मोरे, शरद जराडे व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार आंबेगाव येथील सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलमध्ये एप्रिल २०२० पासून आजपर्यंत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या आंबेगाव येथील कॅम्पसमध्ये सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल आहे.

या शाळेत २७ शिक्षक कार्यरत आहेत. गेली अनेक वर्षे सेवा बजावत असूनही त्यांना नियमित पगार देण्यात आलेला नाही. संस्थेकडून कधीकधी अर्धा पगार किंवा पगाराच्या नावाखाली अत्यल्प रक्कम दिली जात होती.

एप्रिल २०२० पासून या शिक्षकांना नियमित वेतन मिळालेले नाही. शिक्षकांनी पगाराची मागणी केल्यानंतर सुरुवातीला संस्थाचालक व विश्वस्तांनी वेळोवेळी वेतन देण्याचे आश्वासन देत त्यांचा पगार होईल, असा विश्वास दिला.

मात्र, त्यानंतरही पगार न झाल्याने त्यांनी पाठपुरावा केला असता, “नोकरी करायची असेल तर करा, अन्यथा कामावरून काढून टाकू आणि जीवे ठार मारू,” अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादी शिक्षिकेचे १९ लाख ३६ हजार २०७ रुपये तसेच त्यांच्या २६ सहकारी शिक्षकांचे ४ कोटी ८७ लाख ४७ हजार २११ रुपये, असे एकूण ५ कोटी ६ लाख ८३ हजार ४१८ रुपयांची फसवणूक झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील करीत आहेत.