आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बेकायदा सावकारी विरोधात विशेष तपास पथक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 4, 2026
Spread the love

पुणे : पुण्यातील वाढत्या बेकायदेशीर सावकारीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष पावले उचलली आहेत. बेकायदा सावकारी करून मालमत्ता बळकावणे, फसवणूक करणे, धमकावणे यांसारख्या गुन्ह्यांचा सखोल तपास करण्यासाठी गुन्हे शाखेअंतर्गत विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

बेकायदेशीर सावकारी आणि खंडणीच्या गंभीर तक्रारी आल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा प्रकरणांचा छडा लावण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

वाघोली आणि कोंढवा यांसारख्या परिसरात अशा रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून, गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.

शहरातील नागरिकांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन त्यांना जाळ्यात ओढून बेकायदा सावकारी, आर्थिक फसवणूक, मालमत्ता बळकावणे आणि न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर करून मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

पुण्यातील काही नागरिकांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे दाद मागितली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेत कारवाईचे निर्देश दिले होते.

आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना व्याजाच्या जाळ्यात ओढून, त्यांच्याकडून स्टॅम्प पेपरवर मालमत्ता लिहून घेऊन अव्वाच्या सव्वा व्याजाची आकारणी केली जाते.

पैशांची गरज असलेले लोक त्यावेळी फारसा विचार न करता सावकार जे म्हणेल तसे लिहून देतात. पैसे परत केल्यानंतरही आणखी पैशांची मागणी केली जाते.

पैसे न दिल्यास मालमत्ता ताब्यात घेण्याची तसेच अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते. या घटनांमध्ये वाढ झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले.