आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 4, 2026
Spread the love

बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी यांच्या गुणवत्ता विकास प्रकल्पांतर्गत इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती ग्रंथालय, बार्शी येथे उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तैमूर मुलाणी हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सोलापूर (माध्यमिक) शिक्षणाधिकारी सचिन जगताप उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी प्रास्ताविक करून अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

त्यानंतर संस्थेचे सचिव पी. टी. पाटील यांनी गुणवत्ता विकास उपक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण प्रयत्न आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

प्रमुख पाहुणे सचिन जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यशस्वी होण्यासाठी जोखीम स्वीकारण्याची तयारी, सातत्यपूर्ण वाचन, इतरांना मदत करण्याची वृत्ती आणि ज्ञानाच्या बाबतीत सतत अद्ययावत राहण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

अध्यक्षीय समारोपात तैमूर मुलाणी यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात कठोर परिश्रमाला पर्याय नसल्याचे सांगितले. विद्यार्थी हा आयुष्यभर शिकणारा असतो. योग्य दिशा देणारे गुरु आणि पालक हेच विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे शिल्पकार आहेत.

मातृभाषेसह विविध भाषांचे ज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी आवाहन केले.

यानंतर इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सचिव पी. टी. पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे, सदस्य व्ही. एस. पाटील व बी. के. भालके, महाराष्ट्र विद्यालयाच्या प्राचार्या के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षिका एन. बी. साठे, पर्यवेक्षक के. जी. मदने, सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कसबे व सुहासिनी शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्या के. डी. धावणे यांनी केले.